विशेष प्रतिनिधी
पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला आहे. खराडी ड्रग्ज पार्टीप्रकरणी ससून रूग्णालयाने आपला अहवाल पुणे पोलिसांना सुपूर्द केला आहे. त्यात खेवलकर यांच्यासह दोघांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. Pranjal Khewalkar
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे रोहिणी यांच्यासह त्यांचे वडील एकनाथ खडसे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विशेषतः खडसे यांनी कथित हनी ट्रॅप प्रकरणी भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची कोंडी केली असताना ही घटना घडल्यामुळे यामागे काही षडयंत्र आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ससून रूग्णालयाचा प्रांजल यांच्या वैद्यकीय तपासणी अहवाल आला आहे.
पुणे पोलिसांनी खराडी ड्रग्ज प्रकरणी 5 पुरुष व 2 महिला अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात 7 पैकी 2 जणांनी अल्होहोलचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्कोहोल सेवन करणाऱ्यांत प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. याशिवाय श्रीपाद मोहन यादव नामक आरोपीनेही अल्कोहोलचे सेवन केले आहे. आता पुढील तपासणीसाठी आरोपींच्या रक्ताचे व लघवीचे नमुणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. त्याचा अहवाल 4-6 दिवसांत येण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर या आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का? हे स्पष्ट होणार आहे.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू होती. पोलिसांच्या छापेमारीत घटनास्थळी दारू व हुक्का, कोकेनसह इतर अंमली पदार्थ आढळले. याशिवाय एक लॅपटॉप, तीन पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क व इतर महत्त्वाचे दस्तऐवजही या कारवाईत जप्त करण्यात आलेत. खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमधील 101 व 102 क्रमांकाची खोली प्रांजल यांच्या नावाने बूक करण्यात आली होती. या खोल्यांचे भङाडे 2800 व 10357 रुपये एवढे होते. या दोन्ही खोल्या 25 ते 28 जुलैपर्यंत आरक्षित करण्यात आल्या होत्या.
दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबतची भेट रद्द झाली आहे. त्या प्रांजल खेवलकर यांच्यावरील कारवाईविषयी चर्चा करणार होत्या. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार व शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापही सीपींकडे जाणार होते. रोहित पवार यांच्या पीएने ही भेट नक्की केली होती. पण रोहिणी खडसे वेळेत पोहोचल्या नाही. त्यानंतर अमितेश कुमार यांनी ही भेट रद्द केली.
प्रांजल यांच्या अटकेनंतर जवळपास 24 तासांनंतर रोहिणी खडसे यांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली आहे. कायद्यावर व पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्यवेळी सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या प्रकरणामागे राजकीय कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. तर काहींनी दिव्याखाली अंधार अशा प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.