विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांची साथ देणारे खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यावर मनसेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हे आदेश काढले आहेत. Raj Thackeray
मागील काही दिवसांपासून खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यात आज सकाळपासून वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर असून लवकरच ते मनसेला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याआधीच राज ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांचे कारण देत वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी केली आहे. मनसेच्या पत्रात म्हटलंय की, पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने खेडचे वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नलावडे, माणगावचे सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. या पत्रकावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची सही आहे.
वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष राहिले होते.
वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू होता. परंतु हा संघर्ष कमी करत रामदास कदमांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे. परंतु गणेशोत्सवानंतर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
Loyalist talks about joining BJP, Raj Thackeray directly expels him
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार