विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Daya Dongre
मराठी आणि हिंदी चित्रपटांतील चरित्र भूमिकांमधून दया डोंगरे यांनी प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) मधून प्रशिक्षण घेतलेल्या डोंगरे यांनी ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘लेकुरे उदंड झाली’ अशा लोकप्रिय नाटकांमधून आपली अभिनय कारकीर्द उंचावली. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या ठसकेबाज भूमिका विशेष गाजल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.
दया डोंगरे यांचा जन्म अमरावती येथे झाला होता. काही काळ त्या धारवाड (कर्नाटक) येथेही वास्तव्यास होत्या. त्यांना अभिनय आणि संगीताचा वारसा आई अभिनेत्री यमुनाताई मोडक आणि आत्या गायिका-अभिनेत्री शांता मोडक यांच्याकडून मिळाला. सुरुवातीला त्यांना संगीताची अधिक आवड होती. आकाशवाणीच्या गायन स्पर्धेत त्यांनी यश मिळवले होते. मात्र, पुढे अभिनयाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनय प्रशिक्षण पूर्ण केले.
एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या दया डोंगरे यांनी सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्या ‘नाट्यद्वयी’ संस्थेच्या नाटकांतून काम केले.
‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडा पिडा टळो’ यांसारख्या नाटकांमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना रंगभूमीवरील दमदार अभिनेत्री म्हणून स्थान दिले.
दया डोंगरे यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते रत्नाकर मतकरी आणि दामू केंकरे दिग्दर्शित ‘बिऱ्हाड वाजलं’. त्यानंतर त्यांनी *‘लेकुरे उदंड झाली’*च्या दुसऱ्या आवृत्तीत अभिनेते श्रीकांत मोघे यांच्यासोबत भूमिका साकारली.
‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘संकेत मीलनाचा’, वसंत कानेटकर लिखित ‘माणसाला डंख मातीचा’, आणि ‘माता द्रौपदी’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका सशक्त आणि प्रभावी ठरल्या. त्यांच्या नजरेतील जरब आणि व्यक्तिमत्त्वातील करारीपणा यामुळे त्यांच्या पात्रांना विशेष वजन लाभले.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ, तसेच दूरदर्शनवरील प्रभावी कालखंडात त्या एक यशस्वी आणि प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेल्या. त्यामुळेच आज त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने त्या सोनेरी युगातील एक साक्षीदार गमावला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
त्यांनी साकारलेल्या ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातील विनोदी पण ठसकेबाज सासूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
दया डोंगरे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटविश्वातील एक प्रभावशाली, करारी आणि सशक्त व्यक्तिमत्त्व हरपल्याचे दुःख व्यक्त केले जात आहे.
Marathi theatre and film industry Daya Dongre passes away
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















