विशेष प्रतिनिधी
बीड : माझ्यासह माझी जात व माझा जिल्हा एवढा बदनाम करावा? एक-दोन दिवस नाही, दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या व्यक्तीच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नसेल, ते मी सहन केले, असा संताप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला व तो त्यांना द्यावा देखील लागला. त्यानंतर पासून धनंजय मुंडे हे फारसे कुठल्या सामाजिक कार्यक्रमात फारसे आले नव्हते. रविवारी वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मुंडे यांनी भावनिक भाषण करत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, दोनशे दिवसात मी दोनवेळा मरता-मरता राहिलो. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरे काय हवे? मंत्रिपदाला काय चाटायचे आहे का?
धनंजय मुंडे म्हणाले, दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या. पण त्या आधारावर सगळ्या समाजाला दोषी ठरवू नका. धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत हे कधीच आले नव्हते. माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले. नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी कटकारस्थान केले, त्याच्या विरोधातच लाख रुपयाचा दंड झाला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असे धनंजय मुंडे म्हणाले. संघर्षात काय करायचे तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो तर मला जो आजार आला, तो आला नसता. कारण माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे. माझ्या वाणीवर सरस्वती मातेची कृपा आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिले. माझ्या स्वतःच्या अंगाची, माझ्या कातड्याची जोडी जरी आपल्या पायात घातली तरी ते फेडू शकत नाही.
आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई येणार होत्या. पण त्या म्हणाल्या मी मागे राहते, भाऊ चालला आहे, माझ्या वतीने शुभेच्छा दे. त्यांच्या वतीने देखील मी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या जीवनातला पहिला संघर्ष मी मुंडे साहेबांचा पाहिला. त्यांच्या जीवनातील प्रवास आठवला तरी अंगावर काटा येतो. आज जे काही माझ्यासोबत झाले आहे ते मी सर्व स्वीकारीन. टीका स्वीकारीन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा. धनंजय मुंडे जर चुकला असेल तर त्याला माफ करू नका, जे काही असेल ते माझ्यापर्यंत राहावे, माझ्या जातीपर्यंत नसावे.