राहुरी पोटनिवडणुकीत तटस्थ राहण्याचे बक्षीस, प्राजक्त तनपुरेंना भाजपकडून विधान परिषदेत संधी?

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत तटस्थ राहिल्याचे बक्षीस माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना मिळणार आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपकडून तनपुरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत अस्वस्थता आणि भाजपमधील स्थानिक इच्छुकांची नाराजीही आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. Prajakt Tanpure

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट संपर्कात असल्याचे बोलले जात होते. त्यातच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात आक्रमक भूमिका न घेता तनपुरेंनी तटस्थ भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता त्याच भूमिकेचे “राजकीय बक्षीस” म्हणून विधानपरिषदेची उमेदवारी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे असून नगर जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल दिसून येत असल्याने भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी पोटनिवडणूक प्रचाराच्या सभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानले होते. ते म्हणाले होते की, मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला. मी त्यांना म्हटले की, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जुनाजाणता नेता आपल्यातून गेलाय, ही पोटनिवडणूक आहे. तुम्ही या निवडणुकीतून माघार घेतली तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याला धरुन निर्णय घ्यावा. एका मिनिटांत प्राजक्त तनपुरेंनी माझं म्हणणं मान्य केलं, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, माघार घेतली. यासाठी मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो,
दरम्यान, भाजपमधील स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही उमेदवारीवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी विधानपरिषद उमेदवारीची उघडपणे इच्छा व्यक्त केली आहे. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आहेत.



“२००९ मध्ये पक्षाच्या आदेशानुसार माझ्या वडिलांनी उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही आम्ही पक्षाचा आदेश मानला. आता पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देईल, अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया सत्यजित कदम यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील स्थानिक नाराजी अधोरेखित झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक पसंतीक्रम मतदान पद्धतीने होत असल्याने भाजपकडून तनपुरेंना उमेदवारी मिळाल्यास स्थानिक कार्यकर्ते कोणाच्या पाठीशी उभे राहणार, याची उत्सुकता वाढली आहे. सत्यजित कदम उमेदवारी अर्ज दाखल करणार का? भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाचा निर्णय मान्य करणार की निष्ठावंत उमेदवाराच्या मागे उभे राहणार? यावरून राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये या संभाव्य राजकीय घडामोडींमुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपला नगर जिल्ह्यात आणखी बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Neutral stand in Rahuri bypoll rewarded? BJP may offer Prajakt Tanpure a Legislative Council berth

महत्वाच्या बातम्या