विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून देण्यात येणाऱ्या १७ जागा रिक्त आहेत.राज्यात पहिल्या टप्पात १२ जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर,आता राज्यातील १७ जागांपैकी ५ ठिकाणच्या निवडणुका लवकरच पार पडू शकतात.तर उर्वरित जागांच्या निवडणुका देखील ७५% मतदार उपलब्ध असल्यास पार पडू शकतात, असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक देखील लवकरच होणार असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.सोलापूर मध्ये असलेल्या रिक्त जागेवर भाजपाचे संख्याबळ अधिक आहे,त्यामुळे याठिकाणावरून कुणाला संधी दिली जाते,याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आजपर्यंतच्या इतिहासात कुणाचा विजय?
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघातून २००४ ते २०१० या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून दिलीपराव माने यांचा विजय झाला होता.पुढे २०१० ते २०१६ या कार्यकाळात दीपक साळुंखे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत विजय मिळवला होता.पुढे सोलापूर शहरात राजकीय वारे फिरले आणि २०१६ च्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांचा पराभव करत भाजपाच्या प्रशांत परिचारक यांनी बाजी मारली.
भाजपाकडून कोणत्या नावांची चर्चा?
सोलापूर शहरात आता भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर, संधी कुणाला मिळणार याबद्दल उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.याजागेसाठी प्रशांत परिचारक पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे.तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राम सातपुते आणि भाजपामध्ये नव्याने प्रवेश घेतलेले राजन पाटील आणि दिलीप माने यांच्या नावाची सध्या चर्चा ऐकायला मिळत आहे.
निवडणुकीसाठी एकूण मतदान किती?
निवडणुकीसाठी एकूण ५०१ सदस्य मतदान करणार आहेत.महायुतीमधील भाजपा २६२, एकनाथ शिंदे शिवसेना ७१, राष्ट्रवादी अजित पवार गट ४७ असे सर्व मिळून महायुतीचे ३८० सदस्य आहेत.तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना २७, काँग्रेस १९, राष्ट्रवादी शरद पवार गट ३४ असे एकूण फक्त ७० संख्याबळ आहे.सोबतच अपक्ष ४ आणि स्थानिक आघाडीचे ४७ सदस्य आहेत.त्यामुळे या जागेवर महायुती विजयी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपाचे संख्याबळ लक्षात घेता,भाजपा मित्रपक्षांना जागा सोडणार नसल्याचे बोलले जात आहे.
एकूणच सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि ६ नगरपंचायती असून एकूण संख्या ३४९ आहे.महायुतीचे एकत्रित संख्याबळ २३० आहे तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ७३ आहे, शिवाय स्थानिक आघाडी ४२ तर अपक्ष ४ आहेत. एकूणच सर्व आकडेवारी बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा बाजी मारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.