विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. Mahavikash Aghadi
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती यांनी केली आहे.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रविण चक्रवर्ती पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? मतदारयाद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर ५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली, या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवाशी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवाशी नसल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर १३२ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २० ते २५ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील ६२ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच १३२ मतदारसंघातून ११२ जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्वाचे आहे. मतदार याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे, त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावी ही काँग्रेसची मागणी आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे पण निवडणूक आयोगाने या ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ केले आहे, असेही चक्रवर्ती म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते, निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Petition of 100 candidates of Mahavikash Aghadi who lost in the assembly
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार