विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!” असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. Raj Thackeray
सोमवारी आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. ज्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. Raj Thackeray
सोमवारी केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना आयआयटी मुंबईबाबत विधान करत म्हटले होते की, “आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रास बद्दलही माझ्या याच भावना आहेत.” पण त्यांनी केलेल्या या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना “आता तरी डोळे उघडा” असे म्हणत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “जितेंद्र सिंह यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे असे स्पष्ट दिसत आहे.” असे म्हणत ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर मुंबई आणि एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानावर संताप व्यक्त करणारी पोस्ट लिहित सरकारला खडेबोल सुनावले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बॉंबे तसेच ठेवले त्याचे मुंबई केले नाही, हे चांगले झाले, असे विधान केले’. जितेंद्र सिंह यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे असे स्पष्ट दिसत आहे आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!” असे ठाकरेंनी म्हटले आहे.
तसेच “खरंतर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझे आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकते. कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसे. तुम्ही आणि तुमचे शहर यांना खुपतंय.” असे यावेळी ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100 टक्के शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बॉंबे’च हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे ! तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरू केले आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवे !” असे म्हणत राज ठाकरेंनी मुंबईला महाराष्ट्रापासून विभक्त करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा थेट आरोपच आता केला आहे.
Raj Thackeray Slams Jitendra Singh, Says Mumbai’s Place in Maharashtra Still Upsets Him
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















