विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो, राज्य सरकारने आयजी सायबरला विकिपीडियाशी बोलून वादग्रस्त गोष्टी काढून टाकून योग्य माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. विकिपिडियावरील खोडसाळ माहितीमुळे जाणिवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे. विकिपीडिया ने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये अधिकच संताप होत आहे.
शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीसांनी सायबर सेलचे IG यशस्वी यादव यांना तातडीनं मंत्रालयात बोलावून घेतले आणि विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल असलं लेखन खपवून घेतलं जाणार नाही यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.