विशेष प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ईव्हीएमवरील टीकेवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करणे खेदजनक असल्याचे बावनकुळे म्हणाले. Sharad Pawar, criticizes Chandrasekhar Bawankule
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांच्या टीकेवरही प्रतिउत्तर दिले.
शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “शरद पवार हे प्रगल्भ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने निवडणुकीच्या पराभवावरून ईव्हीएमवर शंका घेणे हे आश्चर्यकारक आहे. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या, तर सुनेत्रा पवार हरल्या. तेव्हा ईव्हीएमवर शंका घेतली गेली नाही. पराभवामुळे अशी विधाने करणे शरद पवार यांना शोभत नाही.”
संजय राऊत यांच्या सातत्याने सरकारवर होणाऱ्या टीकेलाही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “संजय राऊत निवडणुकीनंतर जे काही बोलत आहेत, ते केवळ आव आणण्यासाठी आहे. त्यांना ठाऊक आहे की पाच वर्षे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काही होणार नाही.”
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अधिक बळकट होईल, असे आश्वासन देत बावनकुळे म्हणाले, “केंद्रीय नेतृत्व, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला जात आहे. महाराष्ट्राला सक्षम आणि न्याय देणारे सरकार मिळणार आहे. काही माध्यमे कल्पित बातम्या पसरवून जनतेला गोंधळात टाकत आहेत, पण यात तथ्य नाही.”
बावनकुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना सल्ला देण्याचे टाळत म्हटले, “महायुती टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारची चुकीची विधाने योग्य नाहीत. केंद्रीय नेतृत्वाचा अंतिम निर्णय झाल्यावर सर्व नेते एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील.
बावनकुळे म्हणाले, “२६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानासमोर नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला आहे. संविधानाने आपल्याला दिलेली जबाबदारी स्वीकारून देशाला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध राहणे ही आपली प्राथमिकता आहे.”
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले, “आजच्या दिवशी संपूर्ण देश शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्रावर झालेला हा हल्ला देश विसरू शकत नाही. त्या धडाडीने आजचे नेतृत्व राज्याला न्याय देणाऱ्या सरकारकडे घेऊन जात आहे.