विशेष प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा परिसरातून सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर (जुबैर) हंगरगेकर या ३२ वर्षीय व्यक्तीस अल-कायदा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. व्यावसायिक ओळखीचा फायदा घेऊन राज्यात आणि देशातील इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवायांचे नियोजन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, ही अटक ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात पार पडलेल्या मोठ्या शोध मोहिमेशी संबंधित आहे. या मोहिमेदरम्यान एटीएस पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, हार्ड ड्राइव्ह, कागदपत्रे आणि जिहादी साहित्य जप्त केले होते. या पुराव्यांचे विश्लेषण केल्यानंतर UAPA (Unlawful Activities Prevention Act), 1967 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि २७ ऑक्टोबर रोजी जुबेर हंगरगेकरला अटक करण्यात आली.
स्थानिक न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हंगरगेकर एनक्रिप्टेड अॅप्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता आणि पाकिस्तानातील हँडलर्सशी संपर्कात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तो सायबर प्रोपगंडा, निधी संकलन आणि भरती प्रक्रियेत गुंतलेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “झडतीदरम्यान आम्हाला पाकिस्तानस्थित मॉड्यूलशी संबंधित अत्यंत संवेदनशील डिजिटल माहिती मिळाली आहे. तो तांत्रिक सहकार्याच्या नावाखाली काही तरुणांना जोडण्याचा प्रयत्न करत होता.”
एटीएस आता त्याच्या डिजिटल फूटप्रिंट, आर्थिक व्यवहार आणि परदेशी संपर्कांच्या नोंदींचा तपास करत आहे, ज्यातून राज्यातील संभाव्य स्लीपर सेल्सचा मागोवा घेण्यात येत आहे.
हंगरगेकर पुण्यातील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता आणि कोंढव्यात साधी जीवनशैली जगात समाजात मिसळून राहत होता, त्यामुळे त्याच्यावर संशय निर्माण झाला नव्हता. या घटनेने पुण्याच्या आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एटीएसचा तपास पुढे सुरू असून, या नेटवर्कशी संबंधित आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र एटीएसने स्पष्ट केले आहे की, देशातील सायबर आणि तंत्रज्ञानाधारित दहशतवादाला रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत आणि अशा धोक्यांना मुळातच नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Software Engineer Arrested in Pune for Alleged Al-Qaeda Links; ATS Launches Major Crackdown
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















