पार्थ पवारांच्या सक्रिय राजकारणाला तटकरे यांचा पाठिंबा; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही दुजोरा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पार्थ पवारांच्या सक्रिय राजकारणाचे समर्थन करताना हा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा आणि योग्य असल्याचे म्हटले आहे. संघटनेत काम करताना वेगवेगळी मते असू शकतात, मात्र पक्षाच्या बळकटीसाठी तरुण नेतृत्व पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. NCP factions

तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली आणि पक्षाला शरद पवार यांच्यासारखे सहा दशकांहून अधिक काळ देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे नेतृत्व लाभले. पक्षात नेहमी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याची परंपरा राहिली असून तीच परंपरा अजित पवार यांनीही पुढे सुरू ठेवली होती.

प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणासाठी बैठका झाल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले की, यात कोणताही गौप्यस्फोट नाही, तर ही वस्तुस्थिती आहे.

ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. काही बैठकींना मी उपस्थित नव्हतो, मात्र त्या बैठकींची माहिती दादा मला देत असत. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी काही नवीन माहिती दिली असे म्हणता येणार नाही.”उमेदवारी जाहीर होण्यास उशीर का होतो?



निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांची नावे जाहीर होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, महायुतीसारख्या आघाडीत तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने जागावाटपावर सखोल चर्चा करावी लागते.
“प्रत्येक पक्षाचे स्वतःचे राजकीय गणित असते. सर्व बाबींमध्ये तात्काळ एकमत होत नाही. अनेक प्रश्न केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवले जातात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्व घटक पक्षांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काहीवेळा निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो,” असे ते म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना तटकरे यांनी चंद्रपूर महापालिकेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, काँग्रेसकडे बहुमत असूनही त्यांना स्वतःचा महापौर निवडून आणता आला नाही.
“काँग्रेसमध्ये नेमके काय सुरू आहे हे मला माहिती आहे, मात्र त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पण बहुमत असूनही महापौर निवडता आला नाही, यावरून त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काही नगरसेवक संपर्काबाहेर जात असतील, तर त्यामागील कारणांचा शोध काँग्रेसने घेतला पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत शंका कायम अजित पवारांच्या विमान अपघाताला पाच महिने उलटून गेले असले तरी तो अपघात होता की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विमान अपघातांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. राज्य सरकारने सुरुवातीला सीआयडी चौकशी जाहीर केली होती. त्यानंतर पक्षाच्या मागणीनुसार सीबीआय चौकशीही सुरू करण्यात आली.
“विमान अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्ससह विविध तांत्रिक बाबींची सखोल तपासणी केली जाते. आमच्याही मनात काही शंका आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री तसेच अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तपास लवकर पूर्ण व्हावा आणि त्याचा अहवाल राज्य व देशातील जनतेसमोर यावा, ही आमची भूमिका आहे,” असे तटकरे यांनी सांगितले.

Tatkare backs Parth Pawar’s active political role, confirms merger talks between NCP factions

महत्वाच्या बातम्या