महिला अधिकाऱ्यांशी अश्लील वर्तन, बदल्यांचे रॅकेट; अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे, धमक्या देणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मंत्री अदिती तटकरे यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणात अदिती तटकरे आणि राजेश गायकवाड यांच्यात आर्थिक लागेबांधे आहेत का, असा सवाल उपस्थित केला आहे.

महिला व बालविकास राज्यपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत राजेश गायकवाड यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीत गायकवाड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महिला अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली, अश्लील आणि घाणेरड्या भाषेचा वापर केला तसेच अधिकाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, अनेक अधिकारी व्यावसायिक नुकसान होण्याच्या भीतीने गायकवाड यांच्या गैरवर्तनाविरोधात उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत. काही अधिकाऱ्यांना खोट्या प्रकरणांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, महिला अधिकारी तसेच अल्पसंख्याक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील अधिकाऱ्यांविषयी गायकवाड यांचा दृष्टिकोन अत्यंत असंवेदनशील आणि संकुचित आहे. सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर अधिकाऱ्यांचा अपमान केल्याच्या तक्रारीही संघटनेकडे प्राप्त झाल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बदल्या आणि प्रतिनियुक्ती प्रक्रियेत गायकवाड यांनी समांतर यंत्रणा उभी करून आर्थिक व्यवहार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून अधिकाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात असून, सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांना गैरसोयीच्या पदस्थापना दिल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही त्रयस्थ व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.



तसेच, नियमबाह्य कामांना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या प्रकरणात कागदोपत्री आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चौकशीवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन राजेश गायकवाड यांना तातडीने पदावरून हटवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “महिला व बालविकाससारख्या संवेदनशील विभागात अशा प्रकारचे आरोप होणे धक्कादायक आणि निंदनीय आहे. २०१९ पासून राजेश गायकवाड या विभागात खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. अनेक महिलांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही,” असे त्या म्हणाल्या.

“राजेश गायकवाड महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत बोलतो, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देतो आणि मोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेट चालवतो, असे आरोप आहेत. मग अदिती तटकरे यांचा त्याला वरदहस्त आहे का? त्यांच्यात काही आर्थिक संबंध आहेत का? याचे उत्तर राज्यातील महिलांना मिळाले पाहिजे,” असा सवालही रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.

Transfer Racket Alleged Against Aditi Tatkare’s Private Secretary”

महत्वाच्या बातम्या