विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दूरध्वनीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काँग्रेसने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे ठाकरे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. Uddhav Thackeray and Sanjay Raut Reportedly in Talks
महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबद्दल सध्या साशंकता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे उद्धव ठाकरे गटामध्ये अस्वस्थता आहे, आणि याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर भाजपशी साधलेल्या संपर्कामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांकडूनच ठाकरे आणि राऊत भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
काँग्रेससोबतची जागावाटपाबाबतची चर्चा अयशस्वी ठरत असल्याचे संकेत आहेत. याच कारणास्तव कालच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी आपली बैठक अर्धवट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेसबरोबर जागा वाटपाबाबतची नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले होते.
सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसने आपल्या जागांवरून माघार न घेतल्यास महाविकास आघाडी तुटू शकते, आणि यामुळे महाराष्ट्रात भाजपसोबत नवीन राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण होऊ शकते. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सध्या दोलायमान अवस्थेत असून, महाविकास आघाडीत राहणे की भाजपसोबत जाणे याचा निर्णय लवकरच घेण्याची अपेक्षा आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे गट आणि भाजपमधील ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय स्थिरतेवर मोठा परिणाम करू शकते. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) भाजपसोबत गेल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.
दरम्यान या सगळ्या चर्चा नंतर काँग्रेसने ही स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. ही सरळ सरळ पतंगबाजी आहे, दुसऱ्या भाषेत मोठी सुपारी असे म्हणता येईल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.