प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरात तीव्र आंदोलन; राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. संत सावता माळी यांच्या संजीवन समाधीस्थळासाठी ओळखल्या जाणाऱ्या अरणसह पंचक्रोशीतील गावांतील बाधित शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले असून शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींना तीव्र विरोध दर्शविण्यात आला. “शेती वाचवा, गाव वाचवा” अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला.

दरम्यान, आंदोलनस्थळी राजू शेट्टी आणि सोलापूर पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन मोडून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. पोलिसांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले.



अरण गावातील ७५ वर्षीय महिला शेतकरी रतन निवृत्ती पाटील यांनी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले. “जमीन गेली तर जगायचं कसं?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणी केली.

अरणसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती जमीन बाधित होणार असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन हिरावले जाणार आहे. संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी परिसरालाही या प्रकल्पाचा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Verbal clash between Raju Shetty and the police

महत्वाच्या बातम्या