विशेष प्रतिनिधी
खेड : दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? त्यामुळे योगेश कदम यांनी चिंता करायचं काम नाही. कारण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना अभय दिले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून दोन दिवसांपूर्वीच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत दावा करण्यात आला होता. ज्या मंत्र्यांमुळे महायुती वादात सापडत आहे, अशा आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याचा दावा सामना मधून करण्यात आला आहे. यानंतर मंत्रिमंडळातून डच्चू मिळणारे आठ मंत्री कोण असतील? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यात राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचेही नाव असेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावे कांदिवलीत डान्सबार सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही अनिल परब यांनी केली होती. यासंदर्भात अनिल परब यांनी पुरावे देखील दिले होते. त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे.
ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या दिवंगत मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे आणि टीका करून काम बंद करता येत नाही. त्यामुळे योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज खेडवासीयांना सुंदर अशा नाट्यगृहाची भेट मिळत आहे, ही आनंद आणि समाधानाची बाब आहे. कारण 2007 सालापासून हे नाट्यगृह बंद होते. मात्र आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे आज खेडवासियांचे हे स्वप्न साकार होत आहे. यानिमित्ताने चांगल्या कलाकृती पाहण्याची संधी येथील नाट्य रसिकांना मिळणार आहे. दिवंगत मिनाताई ठाकरेंच्या नावाने तयार करण्यात आलेले हे नाट्यगृह म्हणजे शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचे प्रतिक ठरेल, असे गौरवद्गारही एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी काढले.