विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलपणामुळे प्राण गमवावा लागलेल्या तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 24 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. सरकारने हे पैसे संबंधित रुग्णालयाच्या खात्यात वर्ग केले असून, त्यातून या मुलींवर उपचार केले जात आहेत.
गराेदर असलेल्या तनिषा भिसे यांना काही दिवसांपूर्वी दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेऊ म्हणून सांगितले. उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. भिसे यांनी दाेन जुळ्या मुलींना जन्म दिला हाेता. या जुळ्या मुलींचे वजन फार कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. या रुग्णालयाच्या खातात मंजूर झालेली रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी बाळांच्या उपचारासाठी मदत करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, एका बाळाच्या उपचारासाठी 10 लाख, तर दुसऱ्या बाळाच्या उपचारासाठी 14 लाखांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही मदत रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. पुढील उपचारांसाठी आणखी गरज भासली तर त्याचा खर्चही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून केली जाणार आहे, असे या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 4 चौकशी अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झालेत. राज्य सरकारने या प्रकरणी नियुक्त केलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने आपल्या अहवालात दीनानाथ रुग्णालय व डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला आहे. पण ससूने आपल्या 6 पानी अहवालात या दोघांनाही क्लीनचिट दिली आहे. या रिपोर्टमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व डॉक्टर घैसास यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत या प्रकरणी इंदिरा आयव्हीएफ, सूर्या हॉस्पिटल व मनिपाल हॉस्पिटल दोषी असल्याचा दावा केला आहे.
ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार, तनिषा भिसे यांच्या प्रकृतीत इंदिरा आयव्हीएफमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतरही त्यांना 4-5 दिवस दाखल करून घेण्यात आले. ही एक मोठी चूक होती. गरोदर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची गरज होती. या सर्वात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी रुग्णास लवकर दुसरीकडे पाठवणे गरजेचे होते.
तनिषा भिसे यांना 5 तास मंगेशकर रुग्णालयात थांबवण्यात आले होते. पण यावेळी पैसे घेतले की नाही? किंवा हेच कारण होते का? पैसे द्या नाही तर ट्रीटमेंट करणार नाही, असे विविध प्रश्न होते. याविषयी आरोग्य उपसंचालक यांनी करून अहवाल द्यायचा आहे. त्याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे. त्याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली आहे.
अतिजोखमीची परिस्थिती असल्यामुळे तनिषा यांना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेण्याची गरज होती. पण तसे करण्यात आले नाही. त्या महिलेस सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी प्रसूती झाली. पण त्या रुग्णालयात कोणताही कॉर्डिओलॉजिस्ट उपलब्ध नव्हता. महिला रुग्णास हृदयविकाराचा धोका वाढला होता. त्यामुळे जवळपास 2 तास तिला सीपीआर दिले जात होते. गरोदर महिला एक गुंतागुंतीची रुग्ण होती. तिचा मृत्यू मणिपालमध्ये झाला. हा माता मृत्यू असतानाही त्यांनी शवविच्छेदन केले नाही. ससून रुग्णालयाला मृत्यू झाल्यानंतर कळवणे गरजेचे होते. पण ते ही करण्यात आले नाही.
24 lakhs from Chief Minister’s Relief Fund for Tanisha Bhise twin daughters
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती