विशेष प्रतिनिधी
मुंबई : २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयावरून राज्यातील वातावरण आधीच तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत २ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत फक्त ७३ अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी केवळ २७ अर्ज मंजूर झाल्याचे त्यांनी उघड केले आहे. या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
२९ ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली होती. लाखो मराठा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या उपोषणामुळे मुंबईत वाहतूक ठप्प झाली होती आणि प्रकरण हायकोर्टापर्यंत गेले. हायकोर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेर २ सप्टेंबरला सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर मंजूर केला, त्यानंतर जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यात आले.
तथापि, आता डॉ. तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी सांगितले, “जर सरसकट प्रमाणपत्र मिळाले असते, तर अर्जदारांच्या रांगा लागल्या असत्या. फक्त ७३ अर्जांपैकी २७ मंजूर झाले म्हणजे शासन पातळीवर तपासणी काटेकोर सुरू आहे.”
तायवाडेंनी ओबीसी नेत्यांनाही इशारा देत म्हटले, “ओबीसी नेत्यांनी अभ्यास करूनच वक्तव्य करावे; बेजबाबदार विधाने केल्याने समाजात गोंधळ निर्माण होतो.” त्यांनी पुढे आरोप केला की, “आरक्षण संपले” असे वक्तव्य करणारेच ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत.
दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे, तर सातारा गॅझेटवरील निर्णयही लवकरच अपेक्षित असल्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु, तायवाडेंनी सादर केलेला सरकारी पुरावा सूचित करतो की, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले नाही, आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाज अधिक आक्रमक होत चालला आहे.
Babanrao Taywade Reveals Shocking Data on September 2 Government Decision, Only 73 Applications Filed in Marathwada, 27 Approved in 35 Days
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा