विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यभरात ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास मुंबईत धडक देऊ, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला. Chhagan Bhujbal
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देण्याची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एक नाही हे न्यायालयानेही अधोरेखित केले आहे. यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट करीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या मागणीला छेद देणारी भूमिका मांडली.
जरांगे यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ‘ओबीसी’ नेते मैदानात उतरले असून राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात येणार आहेत. या बैठकीला समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह ओबीसी नेते उपस्थित होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी वांद्रे येथील ‘एमईटी’ शैक्षणिक संकुलात ओबीसी नेत्यांची बैठक झाली.
५० टक्के आरक्षण आहे, ते सामाजिकदृष्ट्या मागास जातींसाठी आहे. मराठा समाजाला ते मिळू शकत नाही. ओबीसी प्रवर्गात जाती सामील करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नसून त्याची प्रक्रिया आहे, असे सांगून भुजबळ म्हणाले, जरांगे यांची मागणी मान्य करू नये, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही. शेतकरी म्हणजे कुणबी नाही. तसे असेल तर मग, ब्राह्मण, मारवाडी, पारशी यांना शेती असल्याने तेसुद्धा कुणबी होतील. ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात येईल. त्यासाठी राज्यभर मोर्चे, उपोषणे करण्यात येतील. गरज वाटली तर मुंबईतही आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
ओबीसींना राज्यात २७ टक्के आरक्षण होते. त्यात भटके आरक्षण आहे. विमुक्त तसेच विशेष मागास यांना विभागून देण्यात आले. त्यामुळे राज्यात ओबीसींना १७ टक्के आरक्षण उरले त्यात ३७४ जाती आहेत. १९२१ च्या गॅझेटनुसार निजाम राजवटीमध्ये मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी २४ लाख ७१ हजार इतकी होती. त्यामध्ये ३४ हजार कुणबी आणि १४ लाख ६० हजार मराठा जातीचे लोक होते. याचाच अर्थ मराठ्यांच्या तुलनेत ३ टक्केच्या आसपास कुणबी जातीचे प्रमाण होते. मग, राज्यातील सरसकट मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मनोज जरांगे कशी काय मागणी करतात, असा सवाल भुजबळ यांनी विचारला.
मराठा समाजाला हे १० टक्के आरक्षण उपलब्ध आहे. मराठा समाजाची मागणी ओबीसी प्रवर्गात सामील करण्याची आहे. पण, मराठा हा आर्थिक व शैक्षणिक मागास असला तरी तो सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal is aggressive against Jarange, OBCs attack Mumbai to oppose Maratha reservation
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल