विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असेही ते म्हणाले.मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला आहे. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल एनआयए जिल्हा सत्र न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार.” अशी पोस्ट केली.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन युपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत अल्पसंख्यकांचे लांगुलचालण करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे असा प्रचार केला होता. आज हा प्रचार किती खोटा होता हे उघड झाले. काँग्रेस व यूपीएने षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता, हे कोर्टाने पुराव्यानिशी सांगितले आहे. त्यामु्ळे या प्रकरणी त्यांनी ज्यांच्यावर कारवाई केली, त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी या देशात भगवा व हिंदू दहशतवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, ते पाहता काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सर्व आरोपी सुटले, तर मग हा बॉम्बस्फोट केला कुणी असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, कुणी केला हे आता पोलिस सांगतील. त्यावेळच्या यंत्रणेने काय तपास केला? हे त्या यंत्रणेला विचारावे लागेल. उद्धव ठाकरे सध्या ज्या लोकांसोबत बसले आहेत त्यांचेच त्यावेळी सरकार होते. त्यांच्याच पोलिसांनी हे केले होते. माझी तर अपेक्षा होती की, त्यांनी भगव्या दहशतवादाचा हा नरेटिव्ह पूर्णतः अयशस्वी झाला याबद्दल अभिनंदन करण्याची गरज होती. पण आता ते लांगुलचालण करणाऱ्यांसोबत गेलेत. त्यामुळे ते असा प्रश्न विचारत असतील.
पत्रकारांनी यावेळी सरकार या प्रकरणी वरच्या कोर्टात जाईल काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर ते म्हणाले, आम्ही हा निर्णय सखोलपणे समजून घेऊ. त्यात काय आहे काय नाही हे पाहिल्यानंतर एखादा निर्णय घेतला जाईल. पण सध्या ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत, ते पाहता हे एक षडयंत्र होते हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
कोर्टाने तपास यंत्रणेच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत. तत्कालीन सरकार याला जबाबदार आहे असे वाटते का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी या प्रकरणी पोलिसांना दोष देणार नाही. यूपीए सरकारने हे षडयंत्र रचले होते. त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता. त्यामुळे पोलिस यंत्रणेने त्यावेळी केलेले हे काम आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत होती. त्यांना एवढेच सांगण्यात आले होते की, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत. त्यातून इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द पुढे आला होता, तो 9/11 हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला होता.त्याचे प्रत्युत्तर म्हणून भगवा टेररिझम हा शब्द आणायचा आणि त्यातून लांगुलचालण करायचे, अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता. त्या दबावाखाली या केसेस झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यासाठी पोलिसांपेक्षा तत्कालीन यूपीए सरकार जास्त जबाबदार आहे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.