विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला अशी कबुली शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ब्रँड ठाकरे नावाखाली उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले मात्र विधानसभेला अनपेक्षित अपयशाला सामोरे जावे लागले या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. मविआत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे हे आपलेपण होते. विधानसभेला मला जिंकायचंय हा जो मी पणा आला त्यामुळे पराभव झाला. सगळ्या गोष्टीत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत.
ठाकरे म्हणाले की, ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले, हे लोकांसमोर आलंय. लाडकी बहीणसारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाली की स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले.
एवढं पाशवी बहुमत मिळाले पण जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघायला पाहिजे होता, तो अवाक् का झाला? ग्रामीण भागातले अनेक लोक म्हणतात, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केले तरी आमच्या गावात तुम्हाला इतकी मते कशी मिळाली माहिती नाही. पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात. ईव्हीएम हँकिंगचा मुद्दा वेगळा पण लोकशाहीत आरटीआयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर माझी माहितीही मिळाली पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान व्हायला पाहिजे. मुळात ईव्हीएम का आणले, मतमोजणीचा वेळ वाचवायला, मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, ती वेळ का धरत नाही. अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होते ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Defeat due to infighting in Mahavikas Aghadi, Uddhav Thackeray admits
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला