Devendra Fadnavis : नारायण राणे मोजमाप न ठेवणारे दिलदार माणूस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग: Devendra Fadnavis : नारायण राणेंचा विधानसभेत मोठा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षात असतानाही आम्ही सरकारवर तुटून पडायचो. परंतु नारायण राणे मोजमाप न ठेवणारे दिलदार माणूस आहेत, असे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis :

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आज (10 एप्रिल) कणकवलीत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. नडवे नाका येथे आयोजित भव्य सोहळ्यात नारायण राणे यांनी केक कापला. मात्र त्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक केले.Devendra Fadnavis :



देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं. तेव्हा नारायण राणे यांनी चिठ्ठी पाठवून माझे कौतुक केले होते. ‘छान बोललास’ असा मजकुर असलेली नारायण राणे यांनी पाठवलेली चिठ्ठी मला आजही आठवते. तसेच नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी मोठी संधी होती. कारण दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. खरं तर नारायण राणे यांची अर्थसंकल्पावरची पकड विलक्षण होती. ते एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे बजेटवर बोलायचे. युती सरकारच्या काळात झालेल्या कामाची काँग्रेस सरकारने श्वेत पत्रिका काढल्यानंतर नारायण राणे यांनी त्यावर ‘भगवी पत्रिका’ मांडत सरकारची जोरदार बाजू मांडली होती, अशी आठवणही यावेळी फडणवीस यांनी सांगितली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंचा विधानसभेत मोठा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षात असतानाही आम्ही सरकारवर तुटून पडायचो. परंतु नारायण राणे मोजमाप न ठेवणारे दिलदार माणूस आहेत. खरं तर कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो, असं पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे आणि ते राणेंना पाहूनच लिहिलं असावे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नारायण राणेंच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, नीलम राणे यांचा नारायण राणेंना नेहमीच भक्कम पाठिंबा राहिला आहे. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात नारायण राणे यांचा राजकीय वारसा स्पष्टपणे दिसतोय. नारायण राणे देशाचे आणि राज्याचे नेते असले तरी त्यांच्या हृदयात कोकण आहे. खरं तर नारायण राणेंना अजून खूप नेतृत्व करायचे आहे. त्यांचा 100वा वाढदिवसही आपण अशाच मोठ्या मैदानावर साजरा करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“Narayan Rane a Large-Hearted Leader,” Praises Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या