Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या सहकार भवनचे भूमिपूजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई – Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रतीक्षा नगर येथे मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून मुंबईत उभे राहणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या सहकार भवनाचं भूमिपुजन पार पडले. त्याचबरोबर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मुंबई हौसिंग फेडरेशन संचलित विक्रोळी येथील सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यूदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरचाही प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश म्हाडा उपाध्यक्षांना दिले.Devendra Fadnavis

याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विनय कोरे, आमदार तमिल सेलवण, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, आनंदराव गोळे, अनिल गजरे, संचालिका जयश्री पांचाळ, तेजस्विनी घोसाळकर, शिवसेना गटनेते अमेय घोले, भाजपा महापालिका गटनेते गणेश खणकर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडा मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांसह मोठ्या संख्येने सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गृहनिर्माण व्यवस्थापन पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आलेDevendra Fadnavis



भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत सहकार भवन असावे ही संकल्पना प्रवीण दरेकर यांनी मांडली व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. जमीन शोधून काढण्यापासून सर्व काम त्यांनीच केलं. नंतर महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ही जमीन मुंबई बँकेला हस्तांतरित केली. म्हाडाच्या माध्यमातून अतिशय चांगले सहकार भवन निर्माण करणार आहोत. सहकाराच्या क्षेत्रात ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी या सहकार भवनात प्राप्त होणार आहेत. सहकाराच्या क्षेत्रामध्ये देशात सर्वात जास्त सहकारी संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत. सहकारी संस्थांमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आहे. या गृहनिर्माण संस्थांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर एमएमआर रीजन पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांमध्ये आहे. राज्यामध्ये सहकाराला वेगळं स्थान आहे. सहकाराने विशेषता ग्रामीण भाग, शेती, शेतीपूरक उद्योग यात अतिशय उत्तम काम केले आहे. त्याचवेळी सहकारातून गृहनिर्माणाचे क्षेत्र दुर्लक्षित होते. मागील काळात दरेकरांनीच हा विषय हाती घेतला व सातत्याने पाठपुरावा करून सहकारात गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्या वेगळ्या गरजा ओळखल्या. मागील काळात सहकारात बदल केला व गृहनिर्माण संस्थांचा वेगळा भाग सहकार कायद्यात समाविष्ट करून गृहनिर्माण संस्थांसाठी ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सर्व तरतुदी केल्या. त्यानंतर कार्यालयांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, एकाच कार्यालयात सर्वांना यावे लागते. त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणावर संस्थांना दिलासा दिला. डीम्ड कन्व्हेन्स, सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचे मालक करण्याचा निर्णयही केला. त्यामुळे या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाकरिता मोठे अवेन्यू प्राप्त झाले. स्वयं पुनर्विकास हा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी रेटून नेला. शासनाने त्या संदर्भात चांगले निर्णय केले. मी मुख्यमंत्री असताना निर्णय झाले. शिंदे मुख्यमंत्री असताना पुन्हा निर्णय झाले. आता मी मुख्यमंत्री असताना त्यात अडचणी होत्या त्या सर्व दूर केल्या आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी मोठी परिषद झाली. त्या परिषदेत १७ मुद्दे समोर आले. त्या १७ ही मुद्द्यांना मान्यता दिली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्वयं पुनर्विकासाच्या योजना सुरू झाल्या. जवळपास १६०० योजना स्वयंपुनर्विकासाच्या मुंबईत सुरू आहेत. त्या दुप्पट योजना रांगेत आहेत. मुंबई बँकेने स्वयं पुनर्विकासाच्या क्षेत्रात सामान्य मुंबईकराला त्याचे हक्काचे घर मिळण्याकरता जे योगदान दिले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्यात पहिली योजना मुंबई बँकेने तयार केली. आतापर्यंत दोन हजार लाडक्या बहिणींना मुंबई बँक, महाराष्ट्र सरकार आणि लाडकी बहीण योजना यांच्या माध्यमातून व्यावसायिक बनवण्याचे काम केले आहे. मुंबईत ज्या प्रकारे क्लस्टर रीडेव्हलपमेंट सुरू केले. जेव्हापासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या व्यक्तीला साडेपाचशे फुटाचे घर दक्षिण मुंबईत मोफत मिळाले त्या दिवसापासून मुंबईकरांना हा विश्वास झाला की महायुतीचे सरकार हे गरिबाला घर देणारे सरकार आहे. प्रतीक्षा नगरमध्ये जवळपास ८८ इमारती, ट्रांजिस्टर कॅम्प आहेत. ६,२०० भाडे करून येथे राहतात. ३० वर्षापेक्षा जास्त काळ येथे झाला असल्याने काही इमारती धोकादायकही होत आहेत. त्यांची इच्छा आहे आमचाही पुनर्विकास झाला पाहिजे. ज्या प्रकारे अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला त्याच प्रकारे प्रतीक्षा नगरचाही प्रस्ताव तयार करा. प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारची घरं रहिवाशांना कशी देऊ शकू त्याचा आराखडा तयार करावा, असे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

तत्पूर्वी प्रास्ताविक सादर करताना आमदार दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे आमची ऊर्जा आहे. सहकारात ताकतीने काम करतो त्यामागे प्रेरणास्त्रोत देवेंद्र फडणवीस आहेत. आज सहकार भवन उभे राहतेय. राज्यातील सहकार चळवळीला दिशा देणारे हे सहकार भवन ठरेल. मुंबई जिल्हा बँक, सहकारी फेडरेशनच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम फडणवीस यांनी सातत्याने केले आहे. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईत इमारती उभ्या केल्या. लाडक्या बहिणींसाठी शासकीय महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना आणली. स्वयं पुनर्विकासाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पैशाची उपलब्धता शासनाने करून द्यावी. सहकार चळवळीला ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे. अर्बन बँका आज अडचणीत आहेत. २०० कोटी देण्याचा प्रस्ताव अनास्कर समितीने दिला आहे. तीन जिल्हा बँकांना ७०० ते ८०० कोटी दिले आहेत. अजून जिल्हा बँका प्रतीक्षेत आहेत. राज्याला सहकाराचा वारसा आहे. राज्यातील सहकाराला ताकद देण्यासाठी जे जे लागेल ते देवाभाऊ यांच्याकडून करून घेऊ. मुंबईकर व महाराष्ट्रातील जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे अभ्युदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरचाही विकास करावा, अशी मागणीही दरेकरांनी केली. तसेच सहकाराला समर्पित असणारे एक संकुल मुंबईत उभे रहावे या उद्देशाने या संकुलाची उभारणी केली जात आहे. सहकारला दिशा देणारे संकुल आम्ही उभे करू, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने व भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले हे सहकार भवन तळमजला ते दहा मजली असणार आहे. या सहकार भवनात १३८ कार पार्किंगची व्यवस्था त्याचबरोबर व्हीआयपी लॉबी, एक ते चार मजल्याचे प्रशस्त असे ऑडिटोरियम, पाच आणि सहावा मधला मिनी ऑडिटोरियम, प्रशिक्षण वर्ग, कॅन्टीन, सहकारी संघासाठी कार्यालय, मीडिया सेंटर, वाचनालय, लिफ्ट, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा आदी सुविधा सहकार भवनात असणार आहेत.

Devendra Fadnavis Lays Foundation Stone for State’s Largest Sahakar Bhavan

महत्वाच्या बातम्या