CM Devendra Fadnavis : धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

धुळे : CM Devendra Fadnavis शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि अरुणावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दीड वर्षात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून, भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याची प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. त्यानंतर आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व‌ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.CM Devendra Fadnavis



फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रमुख गरजा बनल्या आहेत. याच त्रिसूत्रीवर भर देत शिरपूरने साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक आहे. एकविसाव्या शतकात उद्योग केवळ पैशावर नाही, तर कुशल मनुष्यबळावर चालतात. शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे हे शहर आता उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे मोठे केंद्र बनले आहे. तसेच, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तोडीचे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी भागात उभारून जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. शिरपूर येथे आयटी पार्कसाठी अँकर इन्व्हेस्टर शोधून त्याच्याशी आयटी पार्कबाबत चर्चा करण्यात येईल व आयटी पार्क उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिरपूर येथे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ‘सुपर ५०’ योजना त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. खऱ्या अर्थाने आदिवासी कल्याणाची संकल्पना येथे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. यासोबतच, जगातील प्रगत देशांना दर्जेदार कापड पुरवणारा वस्त्रोद्योग प्रकल्प आणि ‘शिरपूर पॅटर्न’च्या जलसंधारण कामांमुळे दुष्काळी भाग पाणीदार होण्यासोबत परिसराचा विकास झाल्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धुळे जिल्ह्याचा आकांक्षीत जिल्ह्यांमधील समावेशानंतरच्या गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली आहे. यात प्रामुख्याने रसायन व अन्नप्रक्रिया क्षेत्रात १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली असून, केवळ सामंजस्य करार न करता हे उद्योग प्रत्यक्ष उभारले जातील. याशिवाय, दोंडाईचा येथील २५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प हरित ऊर्जेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा ठरणार आहे. महामार्गांचे जाळे, सिंचन व्यवस्था, मुंबई-दिल्ली औद्योगिक पट्टा आणि इंदूर-मनमाड रेल्वेमुळे या भागात एक मोठी व सक्षम औद्योगिक परिसंस्था तयार झाली आहे.

महसुली जमिनीच्या पट्ट्यांवर मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना लवकरच वन जमिनीच्या पट्ट्यांवरही लागू केल्या जातील, अशी घोषणा करून यामुळे आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिरपूर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासात आपण तालुक्याच्या पाठीशी एका ‘भावासारखे’ पूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Dhule and Nandurbar to Emerge as Major Industrial Hubs, CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या