विशेष प्रतिनिधी
मुंबई : आवश्यक असेल तर आपण हिंदी भाषेत संवाद साधावा, यात गैर नाही, असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा मराठी – हिंदी वाद पेटण्याची शक्यता आहे. सरनाईक सातत्याने हिंदीबाबत सकारात्मक भूमिका घेत असून हिंदी मतदारांना आकर्षित करून घेण्याची खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
मिरा-भाईंदरमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मिरा-भाईंदर हे सर्व जातीधर्मांचे शहर आहे. इथे अनेक हिंदीभाषिक नागरिक आहेत. त्यामुळे जर आवश्यक असेल तर आपण हिंदी भाषेत संवाद साधावा, यात गैर नाही. पुढे ते म्हणाले की, मी स्वतः मराठी आमदार असलो तरी, जनतेशी संवाद साधताना जर हिंदी बोलण्याची वेळ आली, तर मी ती बोलतो.
सरनाईक यांच्या या वक्तव्याचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील मराठी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मनसेसह शिवसेनेच्या विरोधी गटांनी सरनाईक यांच्यावर मराठी माणसाची भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. , मूळ आसाममधील असलेले आयुक्त शर्मा यांनी संपूर्ण भाषण मराठीत केले. परंतु त्यानंतर मंचावर आलेले मंत्री सरनाईक हिंदीत बोलू लागले, आणि तेव्हाच अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. मराठी मंत्र्यांना मराठी प्रेक्षकांसमोर हिंदीत बोलायची गरज काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला. आयुक्त मराठीत बोलतात, पण महाराष्ट्राचे मंत्री हिंदीत! असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. काहींनी सरनाईक यांच्यावर शिंदे गट मराठीचा मुद्दा विसरला अशी टीकाही केली आहे.
शिंदे गटाने हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाणूनबुजून ही हिंदीकडे झुकलेली भूमिका घेतली आहे का? कारण मिरा-भाईंदर महापालिकेत हिंदीभाषिक मतदारांचा मोठा प्रभाव आहे.
मिरा-भाईंदर मधील वातावरण आधीच तापलेले आहे. 29 जूनच्या रात्री मनसे कार्यकर्त्यांनी मराठी न बोलणाऱ्या दुकान मालकावर केलेल्या कारवाईनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. जोधपूर स्वीट्स अँड फरसाणच्या मालक बाबूलाल चौधरी यांनी मराठी बोलण्याची काय गरज? असं म्हटले होते. त्यावर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला आणि चक्क कानाखाली वाजवली. हा व्हिडिओ व्हायरल होताच मराठी-अमराठी प्रश्न पुन्हा एकदा पेटला. या घटनेनंतर अमराठी व्यापार्यांनी मोठा मोर्चा काढून मनसेविरोधात घोषणा दिल्या. दोन्ही बाजूंच्या गटात तीव्र वाद आणि मारहाणीच्या घटना घडल्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणावर फोर्स तैनात करावा लागला होता.
Dialogue in Hindi if necessary, Pratap Sarnaik’s statement sparks Marathi-Hindi debate again
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ