विशेष प्रतिनिधी
मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापे घातले आहेत. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची फाईल अनिल परब यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अनिल परब यांनी माध्यमांसोबत बातचीत केली.
शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथील डान्सबार गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी तिथे 22 बारबाला, 22 ग्राहक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. या बारवर एकदा नाही तर तीनवेळा कारवाई झाली आहे. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही वारंवार त्याच प्रकारचा गुन्हा बारचालकांकडून घडला आहे. हा सराईतपणा झाला, असा आरोप परब यांनी केला.
गृहराज्य मंत्र्यांच्या कुटुंबियांकडून राज्यात बंदी असलेले डान्सबार चालवले जात आहेत. त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील
खेडमध्ये अवैध वाळू उपसा केला जात होता, असाही आरोप अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की, वाळू उपसा केल्यानंतर पाच ब्रास वाळू ही गरीबांच्या घरकुलाला देण्याचा कायदा आहे. मात्र ही वाळू डम्प करुन ठेवण्यात आली आहे. त्याचे सर्व व्हिडिओ पुरावे तसेच डान्सबारवरील कारवाईचे पुरावे यांची एकत्रित फाईल मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.
डान्सबारसंबंधी महाराष्ट्रात काय कायदे आहेत, आणि सावली बारमध्ये त्यांची कशी पायमल्ली करण्यात आली, या सर्व कायद्यांचीही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दिली असल्याचे परब यांनी सांगितले. मी दिलेल्या पुराव्यांची दखल घेऊन त्यांनी गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री त्यांच्यावर काही कारवाई करतील असे वाटत नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा होईल याची काही शक्यता नाही, असेही परब म्हणाले.