विशेष प्रतिनिधी
मुंबई : “गेल्या दहा वर्षांतील विकास पाहिला तर महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन ठरत आहे. २०१३-१४ साली महाराष्ट्राचा जीएसडीपी (Gross State Domestic Product) फक्त ₹१२ लाख कोटी रुपये होता. आज तो ₹४० लाख कोटींपेक्षा अधिक झाला आहे. म्हणजेच, राज्याच्या अर्थव्यवस्थेने तीनपट उडी घेतली आहे आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला तसेच महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व कामगारांच्या मेहनतीला जाते,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबई येथे केले.
मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (MACCIA (Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture) शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, MACCIA चे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाचे औचित्य साधून MACCIA चा नवा लोगोही अनावरण करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आज देशातील सर्वाधिक MSMEs (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) आहेत आणि स्टार्टअपच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. हे केवळ आकडेवारी नाहीत, तर ही राज्याच्या सक्षम औद्योगिक धोरणाची आणि उद्योजकांना मिळालेल्या अनुकूल वातावरणाची साक्ष आहे. “गेल्या महिन्यात महाराष्ट्राने ₹३१ हजार कोटींचे GST संकलन केले असून, ते देशातील सर्वाधिक आहे. इतकेच नव्हे तर देशात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) तब्बल ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, जो एक ऐतिहासिक विक्रम आहे.
महाराष्ट्र हे सध्या देशात ‘हाफ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चा टप्पा पार करणारे एकमेव राज्य असून, लवकरच ‘वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ होण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. यामध्ये शेती, उत्पादन, सेवा आणि डिजिटल क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
MACCIA या संस्थेने गेल्या १०० वर्षांत उद्योग, व्यापार आणि शेती क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. याच संस्थेच्या माध्यमातून फिक्की (FICCI) सारख्या राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक संस्थेची पायाभरणी झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “शेठ वालचंद हिराचंद हे या संस्थेचे संस्थापक असून, त्यांनी देशासाठी ‘प्रीमियर पद्मिनी’ सारखी पूर्णपणे भारतीय बनावटीची कार निर्माण केली. त्यांनी स्थापन केलेल्या HAL आणि हिंदुस्तान शिपयार्ड सारख्या कंपन्यांनी अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली.”
राज्य सरकारचे लक्ष केवळ औद्योगिक विकासावर नाही, तर शेती आणि ग्रामीण विकासावरही आहे. “शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि साखळी व्यवस्थापनाद्वारे अधिक उत्पादन व शाश्वत उत्पन्न निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष धोरण आखण्यात आले आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी MACCIA च्या शताब्दी वर्षानिमित्त सर्व उद्योजक, शेतकरी, व्यापारी आणि नवउद्योजकांना पुढील १०० वर्षांसाठी एक नवीन भारत घडवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणारे एक मॉडेल आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. Devendra Fadnavis
Maharashtra’s economy on the verge of ‘trillion dollars’; From Rs 12 lakh crore to Rs 40 lakh crore during Modi’s tenure, says Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी