विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे, घटनास्थळावरून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, लॅपटॉप, इंक आणि कलर प्रिंटरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक हिंडे यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. काही लोक मालवणीतील साई बाबा मंदिराजवळ बनावट नोटांचा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि आरोपींना ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बनावट ५०० रुपयांच्या १७४० नोटा, नोटा छापण्याचे यंत्र, लॅपटॉप आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अट केली आहे.
संपत सामवय्या एंजलपल्ली (४३) आणि रहीमपाशा याकूब शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. हे दोघेही तेलंगणाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून २३ लाख ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मालवणी पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे, आता त्यांचे नेटवर्क किती राज्यांमध्ये पसरलेले आहे? त्यांच्याशी आणखी किती लोक जोडले आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.
Mumbai Police busts fake currency printing racket