विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाची मशाल पेटवली आणि महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पुन्हा टाकली.
महाविकास आघाडीत काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावरून जोरदार वाद आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, असे आवाहन शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोर भर व्यासपीठावरून अनेकदा केले. परंतु काँग्रेस नेत्यांनी आणि शरद पवारांनी त्यांना हिंग लावून विचारले नाही. ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री हा फॉर्म्युला काँग्रेसने रेटून धरला. स्वतः शरद पवार यामध्ये फारसे काही बोलायलाच तयार नाहीत.
दरम्यानच्या काळात हरियाणामध्ये काँग्रेसचा अनपेक्षित पराभव झाला त्यामुळे शिवसेनेला पुन्हा जोर आला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरचा दावा अजिबात सोडलेला नाही, हे संजय राऊत यांनी आज दसरा मेळाव्यात ठणकावून सांगितले येत्या दोन महिन्यात शिवाजी पार्कवरच आपण विजयी मेळावा घेऊ आणि त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असे त्यांनी परस्पर जाहीर करून महाविकास आघाडीत वादाची मशाल पेटवली.