विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विकारी टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांची भाषा बदलली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनाथ शिंदे यांची भांडणे लावून देण्याची खेळी त्यांनी केली आहे. उध्दव ठाकरे शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते. मात्र शरद पवारांनी अजित पवार यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नुकताच दिल्लीमध्ये सत्कार केला. त्यांच्या कार्याची स्तुती केली. यामुळे संजय राऊत यांनी ही खेळी रचली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राऊत म्हणाले महाविकास आघाडी तयार करुन सरकार बनवलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही. त्यांनी बेइमानी केली. त्यांनी जर शब्द पाळला असता 50-50 चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता कोणाला पुढे आणण्याचा. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाडला नाही. त्यामुळे महाग कसा आघाडी करण्याचा निर्णय सामुदायिकपणे घ्यावा लागला. त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता.
त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही.एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते. पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी तसेच ज्यांनी परवा सत्कार केला ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सर्वांची भूमिका होती. एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही. फार ज्युनिअर आहेत. त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही , अशी पवारांची भूमिका होती असे राऊत म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु नका, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं का?” त्यावर राऊत ‘हो म्हणाले. यात लपवण्यासारखं काय आहे?’ “भाजप बरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. पण. राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.