विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. महायुती सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करेल.
या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी डिसेंबर महिन्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. आता या मागणीच्या आधारावरमहायुती सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ३१ जानेवारी रोजी काढला आहे. या विशेष तपास पथकात राजीव जैन (पोलीस उपमहानिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई), नवनाथ ढवळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ मुंबई) आणि आदिकराव पोळ (सहायक पोलीस आयुक्त – मुंबई शहर) या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास पथकाला अहवाल सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. या पेन ड्राईव्हमध्ये सदर षडयंत्राचे स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला होता. पेन ड्राईव्ह सादर केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सभागृहात कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे उत्तर देताना एसआयटी स्थापन केली जाईल, असे सांगितले होते.
फडणवीस यांना अडकविण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याबाबत एक पोलीस उपायुक्त सामान्य नागरिकावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओत दिसत असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दबाव टाकला होता. तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली होती, असा जबाव व्यापारी संजय पुनामिया यांनी दिला होता. या प्रकरणाची एक स्टिंग आपल्याकडं असल्याचा दावा पुनामिया यांनी केला होता. पुनामिया यांनी हा दावा केल्यानंतर दरेकर यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यानंतर फडणवीस सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही अशाच प्रकारचा आरोप मागे केला होता. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे आणि पी.पी. चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला, असे त्यांनी सांगितले होते.
SIT constituted to investigate the conspiracy against Fadnavis-Shinde
महत्वाच्या बातम्या