State Government : उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य सरकारकडून तीन नवीन नियम जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : State Government  राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने तीन सविस्तर मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department ) उष्णता सतर्कतेनुसार या उपाययोजना राबवण्यात येणार असून, उष्णतेमुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.State Government

या एसओपींचा मुख्य भर १५ उच्च उष्णता जोखमीच्या जिल्ह्यांवर आहे. यामध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, रिक्षाचालक, स्वच्छता कर्मचारी तसेच कोळसा खाण कामगारांना या उपाययोजनांचा मोठा फायदा होणार आहे.State Government

पहिली एसओपी बाहेर काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे. या अंतर्गत उष्णतेच्या सतर्कतेनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, दुपारच्या तीव्र उन्हात काम टाळणे, नियमित पाण्याचे ब्रेक देणे, पाणी पिण्याची केंद्रे उभारणे, ओआरएसचे वितरण करणे, सावलीची व्यवस्था करणे आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यावर भर देण्यात आला आहे.

दुसरी एसओपी चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगारांसाठी आहे. या एसओपीमध्ये उष्णता ताण कमी करण्यासाठी थंड विश्रांती केंद्रे, पुरेशा पाण्याचा पुरवठा, योग्य वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेशी संबंधित आजार ओळखण्यासाठी प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.

तिसरी एसओपी उष्णता प्रतिरोधक गृहनिर्माणासाठी असून घरांची उष्णता कमी करण्यासाठी कमी खर्चातील उपाययोजना जसे की रिफ्लेक्टिव्ह (कूल) छप्पर, झाडांची लागवड, सावलीची व्यवस्था, योग्य वायुवीजन यावर भर देण्यात आला आहे. तसेच मध्यम आणि दीर्घ कालावधीसाठी पीएमएवायसारख्या गृहनिर्माण योजनांमध्ये उष्णता प्रतिरोधक डिझाइनचा समावेश, बिल्डिंग बाय-लॉजमध्ये बदल आणि हवामानानुसार शहर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारने या उपाययोजना तात्काळ, १ ते ३ वर्षांचा मध्यम कालावधी आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उष्णता जोखीम नकाशे तयार करणे, असुरक्षित गटांची ओळख, जनजागृती मोहीम, थंड केंद्रांची उभारणी यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होत असून, मुंबईत पारा ३६ अंशांपर्यंत पोहोचला आहे. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरकारच्या या उपाययोजनांमुळे नागरिकांना, विशेषतः कष्टकरी वर्गाला, मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

State Government Announces Three New SOPs to Protect Citizens from Heatwaves

महत्वाच्या बातम्या