विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray brothers राज्यातील मतदारयादीतील घोळ, दुबार नावे, बोगस नोंदी आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी यांच्याकडून निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी या प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली जाणार असून मतदारयादीतील दोष, विसंगती आणि गैरव्यवहारांचे ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले जाणार आहेत. या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडून मतदारयादीत पारदर्शकता आणण्याची आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणी करण्यात येणार आहेThackeray brothers
या मुद्द्यावर विरोधी पक्षांचे नेते कायदे तज्ज्ञांच्या संपर्कात असून, विविध पर्यायांचा गांभीर्याने विचार सुरू आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कोर्टात जाणे, निवडणुकांवर बहिष्कार टाकणे आणि निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणे या तीन पर्यायांवर चर्चा झाली. सूत्रांनुसार, विरोधक आता निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यासाठी रस्त्यावर आणि न्यायालयात अशी दुहेरी लढाई लढणार आहेत. राज्यभरातील मतदारयादीतील गोंधळाने निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विशेषतः नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आढळल्याचा पुरावा मनसेने सादर केला आहे.Thackeray brothers
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मतदारयाद्या स्वच्छ केल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नका. त्यासाठी आणखी वर्षभर लागलं तरी चालेल, पण भ्रष्ट यादीवर निवडणुका होऊ देऊ नका, असा ठाम इशारा ठाकरे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले, हा मोर्चा फक्त आंदोलन नाही, तर सत्यासाठीची लढाई आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी स्वतः लोकल ट्रेनने जाण्याची घोषणा केली असून, आपला मोर्चा सामान्य जनतेचा असेल, शासकीय वाहनांचा नाही, असा संदेश दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून या मोर्चात मर्यादित सहभाग राहणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने मोर्चाला पाठिंबा दिला असला तरी पक्षाच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती मर्यादित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चा ऐतिहासिक होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. वाय.बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली होती. या बैठकीत मोर्चाची दिशा, घोषणाबाजी आणि पुढील धोरण यावर सविस्तर चर्चा झाली.
नवी मुंबईत मनसेने केलेल्या रिॲलिटी चेकनंतर मतदारयादीतील बोगसपणा प्रत्यक्ष समोर आला आहे. पाम बीच रोडवरील एका विभागात 250 मतदारांची नोंद झाली होती, मात्र प्रत्यक्ष तपासणीअंती एकही मतदार त्या ठिकाणी राहत नाही, हे आढळले. आणखी एका ठिकाणी, जुईनगरमध्ये, एका मतदाराच्या पत्त्यावर प्रत्यक्षात शौचालय असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. एवढंच नव्हे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या अधिकृत निवास पत्त्यावर तब्बल 150 मतदारांची नावे नोंदवण्यात आली होती. या सर्व प्रकरणांवरून मनसेने निवडणूक आयोगावर थेट बोट ठेवले आहे. हा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वासघात आहे. आयोगाने तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मनसेने केली.
Thackeray brothers preparing to go to court over voter list scam: Concrete evidence will be presented before the court; decision in the next two days
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















