विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुती सरकारच्या कारभारात नैतिकता राहिलेली नाही. असा आरोप करत शिवसेना (ठाकरे) नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक, नितेश राणे, योगश कदम, संजय राठोड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. अर्जुन खोतकर, संजय गायकवाड यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आली आहे. Thackeray group
जबाबदारी आणि प्रशासनाच्या स्वायत्ततेचा बोजवारा उडाला आहे. सत्तेचा उद्दाम आणि बिनधास्त गैरवापर, अपप्रशासन, अपारदर्शक व्यवहार बिनदिक्कतपणे सुरु आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि सार्वजनिक शिस्तभंग हे महायुतीचे ‘शासन’ झाले आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना काढून टाकण्यात यावे अशी जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोललं जात आहे.
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे. गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.