विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरेंचे भोंगे ‘सामना’च्या पिपाणीतून सरकारच्या पॅकेजवर टीका करतात, पण त्यांनी किमान उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पूरग्रस्त भागाच्या पाहणी पर्यटनात काय तारे तोडले होते याची तरी आठवण ठेवायला हवी होती, अशी कडवट टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महायुती सरकारने शेतकऱ्यांना घोषित केलेले पॅकेज हे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर भाजपने जाेरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती धत्तुरा दिला. तेच ठाकरे आज फडणवीस सरकारने दिलेल्या विक्रमी ऐतिहासिक मदतीवर शंका घेत आहेत, अशी टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती धत्तुरा दिला, आणि आज तेच ठाकरे देवेंद्रजीच्या सरकारने दिलेल्या विक्रमी ऐतिहासिक मदतीवर शंका घेत आहेत. यापेक्षा अधिक निलाजरेपणा कोणता असू शकतो? ठाकरेंचे भोंगे ‘सामना’च्या पिपाणीतून सरकारच्या पॅकेजवर टीका करतात, पण त्यांनी किमान उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पूरग्रस्त भागाच्या पाहणी पर्यटनात काय तारे तोडले होते याची तरी आठवण ठेवायला हवी होती. अक्कलकोट सोलापुरच्या दौऱ्यावर असताना उध्दव ठाकरे यांनी स्वच्छपणे सांगितले की, “मी आज काहीही जाहिर करायला आलो नाही. पंचनामे होतील त्यानंतर मदत जाहीर करेन. अजून पाऊस येण्याची शक्यता आहे तोवर तुम्हीच तुमची काळजी घ्या!” म्हणजे तुम्ही पावसात बुडा नाहीतर काहीपण करा, तुमचं तु्म्ही पाहून घ्या, असाच तो आविर्भाव होता, असे ते म्हणाले.
उपाध्ये म्हणाले, कोकणात रत्नागिरीत ज्यावेळी पत्रकारांनी उध्दव ठाकरे ना प्रश्न विचारला तुम्ही जाहिर केलेली मागच्या वादळाची मदत अद्याप मिळाली नाही, त्यावर हे उत्तरले, “हो का? माहिती घेऊन सांगतो!” … ज्यांना दिलेल्या आश्वासनाचं, आपल्याच घोषणेचं काय झालं हे माहित नसतं, ते आता अग्रलेखातून सरकारवर टीका करीत आहेत. जी मदत उध्दव ठाकरेंनी घोषित केली होती ती त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कागदावरच राहिली, आणि त्याची पूर्तता नंतर आलेल्या महायुतीच्या सरकारने केली ही वस्तुस्थिती तरी किमान पहायची होती.
ठाकरे गटाने महायुती सरकारच्या पॅकेजवर निशाणा साधताना म्हटले आहे की, राज्य सरकारचे 31 हजार 628 कोटींचे पॅकेज म्हणजे ‘आकडे मोठे, मदत खोटी’ असा प्रकार आहे. हे 31 हजार कोटी सरकार कसे आणि कधी उभे करणार? ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात कधी पडणार? ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे या पॅकेजची कुऱ्हाड इतर कोणत्या कल्याणकारी योजनांवर पडणार आहे? केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचे काय? राज्यातील सत्ताधाऱ्यांची त्याबाबत दातखिळी का बसली आहे? कर्जमाफीचे काय? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यापैकी एकाचेही उत्तर राज्य सरकारचे हे धूळफेक पॅकेज देत नाही. राज्यकर्ते आकड्यांचा ‘खेळ’ खेळत आहेत आणि त्या खेळात आधीच अतिवृष्टीचे पाणी नाकातोंडात गेलेल्या बळीराजाचा जीव जात आहे. पॅकेजच्या नावाखाली बळीराजाची क्रूर चेष्टा करणाऱ्या या सरकारचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे.
Thackeray’s Loudspeakers and Saamana’s Drumbeat: BJP Hits Back at Uddhav Over Remarks on Government Package
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा