विशेष प्रतिनिधी
सोलापूर : लग्नाच्या आधी मुलांच्या गोष्टींची वाहवा करणं हे चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही कित्येक महिलांना खराब केलं असेल, हे यावरून कळतं, असा जोरदार हल्लाबोल रोजगार हमी मंत्रीभरत गोगावले यांनी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांच्यावर केला आहे.
अजितदादा गटाचे आमदार राजन पाटील यांनी लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगल्याचा अभिमान आहे, असे म्हटले होते. गोगावले यांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत राजन पाटील यांना सुनावले आहे.
गोगावले म्हणाले, राजन पाटलांबाबत मी वस्तुस्थिती बोललो आहे. वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही. जबाबदार माणसाने काय बोलायला पाहिजे, चालायला पाहिजे हे कळत नसेल तर आता लोकं वेडी राहिलेले नाहीत. शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरंग केलाच ना.
मनोज जरांगे पाटील यांना सल्ला देताना गोगावले म्हणाले की ,जरांगे यांना सूचना वजा विनंती आहे की सर्वच गोष्टी एका वेळेला मागणं योग्य नाही. शासनालाही देताना त्या भविष्यात काळात टिकतील हे पाहायचं असतं. आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं ते टिकवत आहोत. कुणबी नोंदी करून सर्टिफिकेट देत आहोत. काही गोष्टीत सरकारला अडचण होईल असं त्यांनी चालू नये, असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ज्यावेळी वेळ होती, तेव्हा त्यांना करता आलं नाही. आता हातून गेल्यावर सर्वच परत येईल सांगता येत नाही. कारण एवढे बहुमत आमच्याकडे आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना आमच्यासोबत येण्या शिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे लोक आमच्यासोबत येतील. जे येतील ते येतील. जे येणार नाहीत ते नाही येणार. आम्ही कुणावरही जबरदस्ती करणार नाही. आपल्या गावाचा, भागाचा विकास व्हावा असं वाटत असेल तर महायुतीचं सहकार्य घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आमच्याकडे कुणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे. आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकतो.
कोकणातून ठाकरे गट मागेच साफ झाला असता. तिथे फक्त भास्कर जाधव उरले. ते थोड्या फरकाने आले. ते जेवढे त्वेषाने बोलत होते. तेवढ्या फरकाने आले नाही. दोन हजार मताधिक्य घेतले. थोड्या फरकाने आले. नाही तर त्यांचा जय महाराष्ट्र ठरला होता. ते तरले. आता ते विचार करत आहेत काय करायचं ते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि पालघरमध्ये त्यांचे आहेत कोण? एकेकाळी हे जिल्हे त्यांचे बालेकिल्ले होते. ते आम्ही आता एकनाथ शिंदेंचे बालेकिल्ले केले. त्यामुळे उरलेले लोकही आमच्यासोबत येतील, असा दावा गोगावले यांनी केला.