विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरीतील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशिल हगवणे हे दोघे तब्बल काही दिवसांपासून फरार होते. अखेर त्यांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांना यश आले आहे.
राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी असून वैष्णवी ही त्यांची सून होती. वैष्णवीने कथितरित्या आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट करण्यात आले होते; मात्र कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवला. यानंतर आरोपी फरार झाले होते.
राज्यभरातून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महिला संघटनांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनी याची गंभीर दखल घेतली होती.
बावधन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे स्वारगेट परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतत ठिकाण बदलून पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करत होते.
पिंपरीतील वैष्णवी हगवणे हिच्या कथित आत्महत्येने राज्यात मोठा खळबळ उडवून दिली होती. सतत होणारा शारीरिक आणि मानसिक छळ, प्रचंड हुंड्याची मागणी आणि त्यातून उद्भवलेला त्रास वैष्णवीला सहन न झाल्याने तिने आयुष्य संपवले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी नातेवाईकांनी थेट खुनाचाही संशय व्यक्त केला होता.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र ते दोघेही फरार झाले होते. अखेर तब्बल काही दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी स्वारगेट परिसरातून राजेंद्र आणि सुशिल हगवणेला अटक केली.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी अशा महागड्या गोष्टी दिल्यानंतरही सासरच्यांनी 2 कोटींची अतिरिक्त मागणी केली होती. त्यावरून वैष्णवीवर सतत ताण आणला जात होता. पोस्टमार्टम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यामुळे प्रकरण अधिक गूढ बनले.
वैष्णवीचा 10 महिन्यांचा मुलगा आठ दिवसांपासून सापडत नव्हता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन तासात मुलगा सापडला. त्याची जबाबदारी वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. आता सासरे राजेंद्र आणि सुशिल हगवणे यांचीही अटक झाल्याने सर्व प्रमुख आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर