विशेष प्रतिनिधी
पुणे : Bapusaheb Pathare : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांतील पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी स्थानिक समीकरणे जुळवण्याच्या दृष्टीने पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारपुत्राने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश होईल, अशी चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पुणे जिल्हा आता भाजपच्या ताब्यात गेल्याचे दिसत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी गटांचे प्रत्येकी एक आमदार, तर भाजपचे सहा आमदार आहेत. वाढलेल्या आमदारांच्या संख्येमुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे. यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून वडगाव शेरीचे शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच त्यांचे भाचे संतोष भरणे आणि पुतण्या महेंद्र पठारे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
मूळचे भाजपचे असलेले बापू पठारे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्र, लोकसभा निवडणुकीतील यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत टिकवता आले नाही. त्यामुळे आमदार झाले असले तरी बापू पठारे यांचे एकप्रकारे नुकसानच झाले, असे दिसते. यामुळेच की काय, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढवल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या भाच्याला, पुतण्याला आणि पुत्राला भाजपमध्ये पाठवून आपली वाट सुकर करण्याचा बापू पठारे यांचा प्रयत्न आहे का, अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
पठारे यांची प्रभाग क्रमांक २, ३ आणि ४ या क्षेत्रांमध्ये चांगली पकड आहे. त्यामुळे सुरेंद्र पठारे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला, तर याचा भाजपला निश्चितच फायदा होईल. तसेच, जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला याचा लाभ मिळू शकतो. आता भाजप आपली बार्गेनिंग पॉवर वापरून या आमदारपुत्राला पक्षात आणेल का, हे पाहावे लागेल. जर हा पक्षप्रवेश प्रत्यक्षात झाला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का ठरेल.
Bapusaheb Pathare MLA’s son trespassing on Dussehra?
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















