विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंगची जमीन तब्बल २३० कोटी रुपयांना गोखले बिल्डर्सला बेकायदेशीररीत्या विकल्याची घटना अद्याप ताजी असतानाच, आता आणखी एका जैन ट्रस्टच्या जमिनीच्या विक्रीचा संशयास्पद व्यवहार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या नवीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, HND जैन हॉस्टेलचे ट्रस्टी चकोर गांधी हेच या व्यवहारात पुन्हा एकदा प्रमुख सूत्रधार असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. Chakor Gandhi
धंगेकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, औंध येथील जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट (Jivprabha Public Charitable Trust) यांच्या मालकीची सुमारे ३३,७०० चौरस फुटांची मौल्यवान जागा विक्रीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेच्या विक्रीसाठी ट्रस्टींनी मे महिन्यात चॅरिटी कमिशनर कार्यालयात सेक्शन ३६ अंतर्गत अर्ज दाखल केला असून, या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. Chakor Gandhi
धंगेकरांच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण व्यवहारामागे पुन्हा एकदा HND जैन हॉस्टेलचा ट्रस्टी चकोर गांधीच मुख्य सूत्रधार आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “HND जैन हॉस्टेल विक्री घोटाळ्यानंतर आता जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टची जमीन विकण्याचा डाव रचला जात आहे. ट्रस्टच्या नावावर असलेल्या समाजाच्या संपत्तीवर डोळा ठेवून काहीजण लाभार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणत आहेत.” Chakor Gandhi
ते पुढे म्हणाले की, “परवाच मी म्हटले होते की जैन बोर्डिंगच्या गैरव्यवहारातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करावेत. नाहीतर हेच लोक पुढे ट्रस्टच्या जागा विकण्याचा धंदा सुरू ठेवतील. या व्यवहारात HND हॉस्टेल विक्री टोळीतीलच लुटारू सहभागी आहेत का, याचा शोध घ्यावा लागेल.”
धंगेकरांनी याचबरोबर या प्रकरणामागे काही लोकप्रतिनिधींचा हात असण्याचीही शंका व्यक्त केली आहे. त्यांनी मागणी केली की, “धर्मादाय संस्थांच्या नावावर असलेल्या ट्रस्टच्या संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी. पुण्यातील जैन ट्रस्टच्या सर्व जमीन विक्री व्यवहारांची पुन्हा एकदा स्वतंत्र तपासणी व्हावी.”
या घडामोडीनंतर पुण्यातील जैन समाजात आणि धर्मादाय ट्रस्ट वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. समाजातील अनेक ज्येष्ठ सदस्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, “धर्म आणि समाजसेवेच्या नावावर चालणाऱ्या ट्रस्टच्या जागा काही व्यक्तींनी खाजगी फायद्यासाठी विकणे हे जैन समाजासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे,” अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे.
या आरोपांमुळे चकोर गांधी आणि संबंधित ट्रस्टी मंडळी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत, तर चॅरिटी कमिशनर कार्यालयाकडून या प्रकरणाची सुनावणी आणि तपास अधिक गतीमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Chakor Gandhi Back in Spotlight as Ravindra Dhangekar Alleges Another Jain Trust Land Sale in Pune
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















