विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले.
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उप महानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हील टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना, धैर्याने, शहाणपणाने आणि उद्देशाने नेतृत्व करण्यासाठी प्रेरणा देत आहे. त्यामुळे क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे.
२०१६ पासून हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ५४ लाख लोकांपर्यंत सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता केल्याबद्दल फाउंडेशन आणि क्विक हील टेक्नॉलॉजीसचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, फाउंडेशनने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर आणि सायबर-सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या फाउंडेशन बरोबर जोडले जाऊन तळागाळापर्यंत काम केलेले सर्व ‘सायबर वॉरियर्स’ कौतुकास पात्र आहेत.
ते पुढे म्हणाले, सायबर सुरक्षा ही भारतासह जगभरातील सर्वात गंभीर चिंतांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, आज आपण पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. अगदी अशिक्षित छोटा विक्रेता देखील डिजिटल पेमेंट स्वीकारतो. हे प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तंत्रज्ञानाचे यश आहे.
तंत्रज्ञान पुढे जात असताना चुकीचे काम करणारे लोकदेखील वाढत आहेत. तथापि, त्यांची साखळी तोडणे आणि त्यांना पकडण्याचे कामदेखील आपल्याला करावे लागणार आहे. आज सायबर गुन्हेगारीत स्थिर गतीने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सायबर गुन्हेगारीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक त्याचा पैसा गमावणार नाही अशी यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागेल. नुकसानीनंतर उपाययोजना करण्यापेक्षा नुकसानीला प्रतिबंध करण्याच्या आवश्यकतेवर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भर दिला.
शासनाच्या सायबर शाखेतील पोलीसांनाही अशा फाउंडेशनद्वारे सायबर गुन्हेगारीच्या विरोधात कसे काम करता येईल यासाठी संगणक यंत्रणेचे पुरेसे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा इतर देशातून काम करत असल्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यामध्ये नवीन कायदे करण्यासह असलेली धोरणे अधिक मजबूत करणे, सायबरसुरक्षेत अधिक गुंतवणूक करणे, यासह जागरूकता पसरवण्यावर अर्थात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धतींबद्दल शिक्षित करणे यावर भर द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
अनुपमा काटकर म्हणाल्या, सायबर शिक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांना सक्षम करणे, आणि सर्वांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी त्यांना पुढे आणण्यासाठी राबविला आहे. हा उपक्रम केवळ सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठीच नसून छोट्या शहरातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एक आवाज देण्याचा, तेथील समाजघटकामध्ये या क्षेत्रात त्यांचे नेतृत्त्व तयार करण्याचा उपक्रम आहे.
यावेळी सायबर शिक्षा फॉर सायबर सेक्युरिटी उपक्रमात उत्कृष्ट काम केलेले प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांना सायबर वॉरियर्स पुरस्कार वितरीत करण्यात आले.
Courses on cyber security in state universities, Governor C. P. Radhakrishnan’s announcement
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल