विशेष प्रतिनिधी
Pune News: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या डॉ. राधाकृष्ण पवार समितीच्य अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर महिलेच्या मृत्यूचा ठपका ठेवण्यात आला आहे. वेळेवर उपचार न दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा अहवाल मांडला. त्या म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजाराबाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. रुग्ण आणि नातेवाईक 28 मार्चला 9 वाजता रुग्णालयात गेल्यावर 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 2.30 वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला. साडेपाच तासात रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतीही उपचार केले नाहीत, त्याउलट त्यांना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला होता.
रुग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचे सांगितले. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली होती. परंतु, पैसे वेळेत भरू न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, रुग्णाचे मानसिक खच्चीकरण झाले, रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणे आवश्यक होतं, त्यांनी उपचार करणे गरजेचे होते, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती चाकणकरांनी दिली आहे.
गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबतचा अंतीम अहवाल माता मृत्यू अन्वेशन विभागाकडून आज संध्याकाळपर्यंत सादर होईल. आणखी एक अहवाल धर्मादायक विभागाकडून उद्या सादर होईल. या दोन्ही विभागांचे अहवाल आल्याशिवाय कारवाई करण्यात येणार नाही. उद्या तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यावर कारवाई काय करायचे हे ठरेल, पेशंटला योग्य उपचार मिळाले नाहीत असा शासनाचा अहवाल आल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
साडेपाच तास गर्भवती महिला ही रुग्णालयातच होती. त्या तासाच रुग्णालयाने योग्य ते उपचार केले नाहीत. त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रुपाली चाकणकरांनी वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. त्या म्हणाल्या , “आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. १५ मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनिय माहिती सोशल मीडियावर मांडल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.
Deenanath Mangeshkar Hospital blamed for woman’s death, denied treatment due to lack of money
महत्वाच्या बातम्या