विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय विज्ञान क्षेत्रात आपली अमीट छाप उमटवणारे, प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी आपल्या राहत्या घरी झोपेतच शांतपणे प्राण सोडले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.
१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात जन्मलेले डॉ. नारळीकर हे शालेय शिक्षणासाठी वाराणसीत गेले. वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे गणिताचे तज्ज्ञ होते. आई सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी. केंब्रिज विद्यापीठातून बी.ए., एम.ए., पीएच.डी. तसेच रँग्लर पदवी, टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार आदी गौरव प्राप्त करणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शास्त्रज्ञानाचा झेंडा उंचावला.
सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडणाऱ्या डॉ. नारळीकर यांचे खगोलशास्त्रातील योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले.
डॉ. नारळीकर केवळ प्रयोगशाळेतच नव्हे तर समाजात विज्ञान जागृतीसाठीही सक्रिय राहिले. ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘सूर्याचा प्रकोप’, ‘चार नगरांतले माझे विश्व’ यांसारख्या अनेक मराठी व इंग्रजी पुस्तकांतून त्यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार, तर ‘यक्षाची देणगी’ ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता.
त्यांच्या लेखनात विज्ञानाच्या रोमांचक कथा, वैचारिक लेख आणि सामाजिक भानही दिसते. ‘टाइम मशीनची किमया’, ‘प्रेषित’, ‘व्हायरस’, ‘वामन परत न आला’, ‘गणितातील गमतीजमती’, ‘विज्ञानगंगेची अवखळ वळणे’ अशी असंख्य पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना देशविदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
Dr. Jayant Narlikar passes away
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर