विशेष प्रतिनिधी
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिला रुग्ण तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.
राज्य सरकारने नेमलेल्या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, सात महिन्यांची गरोदर असलेल्या तनिषा भिसे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्या वेळी त्यांना तातडीने उपचारांची गरज होती. रक्तस्त्राव होत होता. सुमारे साडेपाच तास त्या रुग्णालयात बसून होत्या. मात्र, रुग्णालयाकडून धर्मादाय योजनेअंतर्गत त्यांना दाखल करून घेतले गेले नाही. उलट, डॉ. सुश्रुत घैसास यांनी “अनामत रक्कम भरता येणार नसेल तर ससूनमध्ये जा” असा सल्ला दिला होता.
रुग्णाचे नातेवाईक आर्थिक अडचणीत असताना देखील धर्मादाय रुग्णालयाने आपली सामाजिक व वैद्यकीय जबाबदारी पार पाडली नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. Bombay Public Trust Act 1950 अंतर्गत येणाऱ्या कलम ४१AA नुसार आपत्कालीन स्थितीत धर्मादाय रुग्णालयांना तात्काळ प्राथमिक उपचार देणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ आणि Indian Medical Council Regulations 2002 यांच्याही तरतुदींचा भंग झाल्याचे समितीने अधोरेखित केले आहे. यामुळे रुग्णालयाची प्रशासन व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर आणि वैद्यकीय निर्णय प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यामुळे संस्थेतील अंतर्गत दडपणाचीही शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य विभागाने आणि पुणे महानगरपालिकेने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Dr. Sushrut Ghaisas of Dinanath Mangeshkar Hospital resigns in Tanisha Bhise death case
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख