विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी 5 हजार 704 कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल.
तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
Government approves Hadapsar to Loni Kalbhor, Hadapsar Bus Depot to Saswad Road Metro
महत्वाच्या बातम्या
- पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली
- चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन
- पुणे पोलीस आयुक्तालयात तोतया आयपीएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
- शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा



















