Ravindra Dhangekar : कसं काय पुणेकर! कुठे आहे धंगेकर?

Ravindra Dhangekar : कसं काय पुणेकर! कुठे आहे धंगेकर?

Ravindra Dhangekar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ravindra Dhangekar : राजकारणात काही नेत्यांची प्रतिभा ही विरोधी पक्षात असतानाच अधिक उठून दिसते. सत्तेत सामील झाल्यास किंवा सत्ताधारी पक्षांशी नाते जोडल्यास त्यांची ही प्रतिभा काहीशी मंदावते. याचे कारण, त्यांचे राजकारण हे रस्त्यावरचे राजकारण असते. रस्त्यावरील प्रश्न हाती घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे, प्रशासनाला घाम फोडणे आणि एखादा मुद्दा लावून धरून सरकारला नाकी नऊ आणणे, असे त्यांच्या राजकारणाचे स्वरूप असते. असाच एक पुण्यातील राजकारणी म्हणजे रवींद्र धंगेकर. ‘हू इज धंगेकर?’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा मतदारसंघ जिंकणारे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर.

कुठलाही लवाजमा न बाळगता स्कूटीवर फिरणारा आणि लोकांनी बोलावले तिथे हजर राहणारा नेता, अशी रवींद्र धंगेकर यांची आमदार होण्यापूर्वी आणि नंतरची ओळख होती. नगरसेवक असताना धंगेकरांना मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदारकीची संधी मिळाली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत धंगेकरांनी ब्राह्मणबहुल कसबा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवला. त्या वेळी ब्राह्मण उमेदवार न दिल्याने भाजपविरोधात तयार झालेली ब्राह्मण समाजाची नाराजी धंगेकरांच्या विजयाला पोषक ठरली, असे बोलले जाते. आमदार झाल्यावर धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पुण्यातील अमली पदार्थांचा वाढता व्यापार, पोर्शे कार अपघात प्रकरण, ससून रुग्णालयातील गैरप्रकार, महानगरपालिकेतील अनागोंदी कारभार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी रान उठवले. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी सरकार आणि प्रशासनाला वेठीस धरले.



मात्र, हळूहळू परिस्थिती बदलली. पोर्शे कार अपघात प्रकरण शांत झाले आणि भाजपाने आपली बाजू सावरली. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर खासदारकी देऊन भाजपने ब्राह्मण मतदारांचा विचार करत असल्याचे दाखवले. यानंतर देशात लोकसभा निवडणुका झाल्या. पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देणाऱ्या रवींद्र धंगेकरांवर काँग्रेसने विश्वास दाखवला आणि त्यांना खासदारकीचे तिकीट दिले. मात्र, यावेळी भाजपाने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देत पुणे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली. भाजपला यश आले आणि धंगेकरांना पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या आणि यावेळीही धंगेकरांची जादू चालली नाही. ज्या हेमंत रासने यांचा पराभव करून त्यांनी कसबा मतदारसंघ जिंकला होता, त्याच रासने यांनी यावेळी पराभवाचा वचपा काढला. विधानसभा निवडणुकीतील हा पराभव धंगेकरांसाठी चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर काँग्रेसमधील त्यांचे वर्चस्व कमी होऊ लागले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर पूर्वीइतके सक्रिय दिसले नाहीत. काही दिवसांनंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तिथे त्यांच्यावर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, तरीही रवींद्र धंगेकर पूर्वीइतके सक्रिय दिसले नाहीत.

मुळात, धंगेकर यांचे राजकारण आक्रमक आहे. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असताना अशा प्रकारचे राजकारण करणे शक्य नसते. त्यामुळे ते पूर्वीइतके सक्रिय दिसत नाहीत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आंदेकर खून प्रकरण, घायवळ टोळीचा गोळीबार यांसारख्या घटना घडूनही धंगेकरांना पुन्हा सक्रिय करू शकल्या नाहीत. पुण्यात अशा घटना घडत असतानाही रवींद्र धंगेकर गायब असल्याचे चित्र आहे. महानगरपालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, तरीही धंगेकर फारसे सक्रिय दिसत नाहीत. महायुतीचा भाग असूनही ते मित्रपक्षांसोबत किंवा महायुतीच्या इतर नेत्यांबरोबर फारसे वावरताना दिसत नाहीत. सलग दोन निवडणुकांमध्ये ज्या भाजपकडून त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यांच्यासोबत काम करणे धंगेकरांना जड जात असावे, असे चित्र आहे.

How can you be a Punekar! Where is Dhangekar?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023