विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune District Congress : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. सर्व पक्षांनी निवडणुकांसाठी आधीपासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सततच्या अपयशामुळे काँग्रेसला आलेली मरगळ अजूनही दूर होताना दिसत नाही. निवडणुका तोंडावर असतानाही काँग्रेसकडून अपेक्षित तयारी झालेली दिसत नाही. अशातच पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवनात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, सहप्रभारी बी. एम. संदीप, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह राज्यभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या बैठकीला उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी पुणे जिल्हा काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आणि मंडल अध्यक्षांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काय तयारी आहे, याबाबत विचारणा केली. प्रत्येक प्रभागातून किती उमेदवार इच्छुक आहेत? निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुती म्हणून एकत्र लढवायच्या? स्वबळावर निवडणुका लढवायच्या असल्यास पक्षाची ताकद किती आहे? पक्षाची शहरातील एकूण स्थिती काय आहे? अशा प्रश्नांवर वरिष्ठांनी शहराध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांची मते जाणून घेतली. उपस्थित असलेल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ‘एकला चलो’चा नारा बुलंद केल्याचे दिसले.
मात्र, बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मुक्तार शेख आणि कार्यकर्त्यांनी “प्रदेशाध्यक्ष आमचे म्हणणे ऐकून घेत नाहीत,” अशी ओरड सुरू केली. शहरातील काँग्रेसची स्थिती आणि पक्षासमोरील समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्षांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष यांनी सांगितले. “आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही,” अशी टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. “आम्ही पक्षातील वरिष्ठांचे मत ऐकतो, त्यांनीही आमचे ऐकले पाहिजे,” अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली. यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला.
सर्व राजकीय पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसत असताना काँग्रेसमधील अंतर्गत वाद थांबताना दिसत नाहीत. काँग्रेसच्या या गटबाजीचा महानगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Internal factionalism in the district Congress is on the rise.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















