विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मागील तीन कार्यकाळात राज्यातील क्रीडा क्षेत्राचं मोठे नुकसान झाले आहे. संघटनेच्या खर्चाचा हिशोब अजित पवारांच्या कार्यकाळात सादर झालेला नाही, असा गंभीर आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी केला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत हाेणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर आराेपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या आहेत. 2 नोव्हेंबरला होणारी ही निवडणूक केवळ संघटनात्मक नसून राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याचे चित्र आहे.
भाजप नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तड अजित पवारांवर गंभीर आरोप करताना म्हणाले, अजितदादांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी. क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच काम करू द्यावे. तेथे राजकारण आणू नये. अजित पवारांच्या मागील तीन कार्यकाळात राज्यातील क्रीडा क्षेत्राचं मोठे नुकसान झाले आहे. तसेच, संघटनेच्या खर्चाचा हिशोब अजित पवारांच्या कार्यकाळात सादर झालेला नाही अजितदादांनी बाजूला व्हावे आणि माजी खेळाडू असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात क्रीडा क्षेत्राची नवी दिशा ठरावी.
अजित पवार हे याआधी तीन वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे संघटनेवर त्यांची मजबूत पकड मानली जाते. दुसरीकडे, मुरलीधर मोहोळ हे माजी कुस्तीपटू असून सध्या भाजपचे लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे या निवडणुकीला क्रीडा क्षेत्राबरोबरच राजकीय प्रतिष्ठेचंही स्वरूप प्राप्त झाले आहे. क्रीडा संघटनांमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आता अधिक संवेदनशील बनली आहे. दोन्ही नेते प्रभावशाली असल्याने राज्यभरातील क्रीडा मंडळी आणि राजकीय वर्तुळ या निवडणुकीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
याआधी काहींच्या अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता दोन्ही नेत्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे थेट लढत अपरिहार्य झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा स्वरूप तणावपूर्ण आणि राजकीय चुरशीचा होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत फक्त 60 मतदार आहेत, जे राज्यातील विविध जिल्हा क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी आहेत. या संघटनांवर गेल्या काही वर्षांपासून राजकीय प्रभाव असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मतांचे गणित कोणाच्या बाजूने झुकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पूर्वी कबड्डी आणि खो-खो संघटनांच्या निवडणुकांमध्ये मतांबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी मतदान आणि मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता कशी राखली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीकडे फक्त क्रीडा संघटना नव्हे, तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
No accounting of expenses, loss to sports sector during Ajit’s tenure, BJP leader alleges
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा