विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या रूपाली पाटील यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. Rupali Chakankar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि महिला अध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या दोघींमध्ये चांगलीच जुंपली आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांनी अप्रत्यक्षपणे महिला डॉक्टरलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या रुपाली ठोंबरेंनी 3 नोव्हेंबरला चाकणकर यांच्याविरोधात गुडलक चौकात आंदोलन केले. चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीकरिता हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रुपाली वि. रुपाली असा वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. पण आता याबाबत रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर तुमच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा पक्षाकडून मागण्यात आला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडून पत्र पाठवण्यात आले. ज्यामध्ये लिहिले आहे की, “आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे सात दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कपया नोंद घ्यावी.” असे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता रुपाली ठोंबरेंना रुपाली चाकणकरांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाकडून आलेले हे पत्र पोस्ट करत लिहिले आहे की, आज रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबंध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी फलटण महिला डॉक्टरच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्याविषयी खरतर काय खुलासा द्यावा? असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे याबाबत रुपाली ठोंबरे नेमका काय खुलासा देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Party warns Rupali Patil against those protesting against Rupali Chakankar
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















