विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगरपालिकेने पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. गणपती किंवा इतर कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने यासंदर्भात आदेश काढले आहे.
केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागाकडून यापूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक जैविक घटक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती तयार कराव्या, असे पुणे महानगरपालिकेने म्हटले आहे. तसेच सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे.