विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालय उद्घाटनात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे अचानक बाहेर पडणे चर्चेचा विषय ठरले आहे. पक्षातील नाराजी आणि त्यांच्यावरील गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकीय भविष्य अनिश्चित असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचा कमबॅक होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या पुण्यातील नव्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मात्र, या समारंभात माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी अचानक बाहेर पडून सर्वांचे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर पोलिसांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवुन त्यांच्यावर गुन्हा करण्यात आला होता, त्यानंतर त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर आजच्या कार्यक्रमातील त्यांचे कृतीमुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे.
नाराजीमागील कारणे काय?
सूत्रांनुसार, पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या कार्यशैलीमुळे मानकर नाराज असल्याचे समजते. त्यांच्यावरील गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाने त्यांना पुरेसा पाठिंबा दिला नाही, अशी त्यांची भावना आहे. याशिवाय, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते, परंतु ती संधी त्यांना मिळाली नाही. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही असंतोष आहे. आजच्या उद्घाटन समारंभात मानकर उपस्थित होते, परंतु राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या आगमनानंतर ते अचानक बाहेर पडले. वैयक्तिक कारणास्तव आपण लवकर निघाल्याचे मानकर यांनी सांगितले असले तरी, राजकीय वर्तुळात याला केवळ सबब मानली जात आहे.
बुडत्याचा पाय आणखी खोलात…
कोणतेही राजकीय पद हातात नसल्यामुळे प्रभाव निर्माण करण्यावर आलेल्या मर्यादा, स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून लवकरात लवकर सुटका करून घेण्याची गरज असताना पक्षातील इतर नेत्यांसोबत नाराज. अशा चहूबाजूंनी अडचणीत सापडलेल्या मानकरांनी उद्घाटन समारंभातून निघून जाऊन आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे बोलले जात आहे. उद्घाटन समारंभातून लवकर बाहेर गेल्याने स्थानिक नेत्यांसोबत त्यांचा मनमिलाफ होणे अवघड असल्याचा संदेश गेल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडते आहे.
आगामी निवडणुकीत कमबॅक शक्य?
शुक्रवारच्या या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणात मानकर पुन्हा सक्रिय होतील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांचा राजकीय पुनरागमनाचा मार्ग खडतर आहे. प्रथम, त्यांना त्यांच्यावरील कायदेशीर आरोपांतून निर्दोष सुटका मिळवावी लागेल. जर त्यांना क्लीन चिट मिळाली, तर त्यांचा राजकीय मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसरे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे त्यांच्यासाठी आव्हान आहे. सध्यातरी त्यांची नाराजी उघड झाली असून, पक्ष त्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देईल का, हे स्पष्ट नाही. येत्या काळात ते पक्षाच्या कार्यक्रमात किती सक्रिय राहतात, यावर त्यांच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज येईल. मात्र, जोपर्यंत त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा होत नाही, तोपर्यंत त्यांचे सक्रिय राजकारण अडचणीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मानकरांचा कमबॅक होणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
PMC election comebak?, Deepak Mankar political future is uncertain,
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला